जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मराठवाडा दौरा केला होता. या दौर्यानंतर स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता दुसर्या लाटेतही राजू शेट्टी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच उपचार घेत आहेत.
उद्या मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने तमाम शेतकर्यांनी पंढरपूरच्या पांडूरंगाला साकडे घालून त्यांना लवकर बरा वाटावे,अशी प्रार्थना करीत आहेत.
राजू शेट्टी यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जयसिंगपूर येथे शिवार कोविड सेंटर सुरू करून सर्व सामान्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर इचलकरंजी, जयसिंगपूरसह जिल्ह्यातील अन्य बाजारपेठ सुरू करा, या मागणीसाठी त्यांनी इचलकरंजी येथे आंदोलन केले होते.
बुधवार (दि.१४) रोजी अहवाल त्यांचा काेराेना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शेट्टी यांच्यावर पुणे येथील डॉ.जोंग यांच्या सल्यानुसार औषध उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून ते गृह अलगीकरणात आहेत.
पहिल्या लाटेत ते पॉझिटिव्ह आल्यानंतर जयसिंगपूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांना श्वसनाचा त्रास अधिक जाणवला त्यामुळे त्यांना पुणे येथील डॉ.जोंग यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.
आता दुसर्या लाटेतही राजू शेट्टी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.