कोल्हापूर, कोकणसह अनेक जिल्ह्यांत ४ दिवस अतिवृष्टी | पुढारी

कोल्हापूर, कोकणसह अनेक जिल्ह्यांत ४ दिवस अतिवृष्टी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर, कोकणसह अनेक जिल्ह्यांत ४ दिवस अतिवृष्टीचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण व कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्राला सोमवारपासून गुरुवारपर्यंत चार दिवस अतिवृष्टीचा इशारादेण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात मात्र पावसाचा जोर कमी राहील.

गेल्या काही दिवसांपासून कोकणात अतिवृष्टी सुरू आहे. मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे. हा पाऊस अजून चार दिवस वाढणार आहे. 19 ते 22 जुलैपर्यंत मुंबई, कोल्हापूर, पुणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी या आठ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होत आहे.

रविवारी झालेला राज्यातला पाऊस (मि.मी.मध्ये) पालघर 240, मुंबई 230, ठाणे 210, वर्सोवा 190, पनवेल, रोहा 180, पेण 170, उरण 150, अलिबाग 120, दापोली 110, लांजा 100, गगनबावडा 120, लोणावळा 80, राधानगरी, घाटमाथा डुंगुरवाडी : 100, ताह्मिणी 70.

जुलैत 24 तालुक्यांत पाऊस कमी

जुलै महिन्यात दक्षिण कोकण, मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली असली, तरीही विदर्भात अनेक जिल्ह्यांत पावसाने कशीबशी सरासरी गाठली आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची ओढ कायम आहे. जुलै महिन्यात राज्यातील 24 तालुक्यांत 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 43 तालुक्यांत 25 ते 50 टक्के, 71 तालुक्यांत 50 ते 75 टक्के, 56 तालुक्यांत 75 ते 100 टक्के, तर 159 तालुक्यांत 100 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Back to top button