मिरजमध्ये पतीकडून पत्नीचा खून | पुढारी

मिरजमध्ये पतीकडून पत्नीचा खून

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज मध्ये पतीकडून पत्नीचा खून झाल्याची घटना घडली आहे. मिरज-टाकळी रस्त्यावरील शिवम पार्क येथे पूजा चेतन माने (वय 25) या विवाहितेचा पतीनेच चाकूने वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी संशयित पती चेतनआनंदा माने (वय 32) हा फरार झाला आहे.

चेतन माने हा आई, वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे कुटुंब टाकळी रस्त्यावर वास्तव्यास आहे. चेतन माने याचा टेलरिंगचा व्यवसाय असून त्याला दारूचे व्यसन आहे. त्यातून त्याचे पत्नीसोबत वारंवार वादावादी होत असे, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याला घरातून बाहेर काढले होते. चेतन हा पूर्णपणे व्यसनाधीन असल्याने कौटुंबिक उदरनिर्वाह त्याचे आई-वडीलच भंगार गोळा करून चालवित होते.

चेतन माने हा रविवारी घरी परतला. घरी परतल्यानंतर देखील माने हा दारूच्या नशेत असल्याने पुन्हा पत्नी पूजासोबत त्याची वादावादी सुरू झाली. त्यातून त्याने धारधार चाकूने पूजा हिच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर चार वार करून पलायन केले.

त्यानंतर पूजा हिला गंभीर जखमी अवस्थेत वॉन्लेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पूजाच्या निधनाचे वृत्त समताच तिच्या लहान मुलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

Back to top button