जत पुढारी वृत्तसेवा : राजकारणात चांगल्या विचारांच्या माणसाची गरज असल्याचा दाखला देत माजी आमदार विलासराव जगताप यांनी खासदार संजय पाटील यांच्यासारखे घातकी मित्र नसावेत. जो खरा मित्र असतो. तो संकटात महत्त्वाचा असतो.
मात्र घातकी मित्र सर्वात वाईट असतात. अशा मित्रांची संगत कधी असू नये त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत मला पाडण्याचे काम त्यांनीच केले आहे. खासदार पाटील यांच्यावर मी विश्वास ठेऊन चूक केली असल्याचे स्पष्ट मत माजी आमदार विलासराव जगताप यांनी सनमडी (ता.जत) येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
ते सनमडी येथील अभिष्टचिंतन कार्यक्रमात नेहमीप्रमाणे आपल्या खास शैलीत व स्पष्टवक्तेपणाने चुकीच्या प्रवृत्तींना फटकारत जोरदार टीका माजी आमदार जगताप यांनी केली. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजप पासून फारकत घेऊन तिसऱ्या आघाडीतून उभे असलेले, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांचा पक्ष प्रवेश झाला असल्याचे जाहीर करत त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाची ताकद वाढली आहे. भविष्यात तालुक्यातील निवडणुका स्वबळावर लढू आज आपण पुन्हा एकत्रित आलो आहे. भाजप मजबूत करू असे आवाहनही जगताप यांनी केले.
माजी आमदार जगताप म्हणाले, आमच्या सारखी माणसं रिटायर झाली पाहिजे, आमची पण तीच मानसिकता होती परंतु मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी उभं राहण्याची माझी इच्छा नव्हती. त्यावेळी खासदार संजय पाटील यांनी तुम्हाला रिटायर होण्याचा अधिकार नाही असे म्हणाले. विधानसभा निवडणूक पुन्हा लढवण्याचा आग्रह त्यांनीच केला. त्यानुसार निवडणूक लढवली.
मला पाडण्याचे काम खासदार पाटील यांनीच केले आहे. अशा लोकांपासून आपण नेहमीच सावध राहिलं पाहिजे. राजकारणात जय-पराजय कोणाच्या नशिबात नाही. असं सांगत विधानसभा निवडणुकीत तीनवेळा मी उभा राहिलो होतो.
त्यावेळी एकवेळा निवडून आलो. परंतु जिल्हा बँकेत मी ज्या ज्या वेळेस उभा राहिलो, त्या त्या वेळेला निवडून आलो आहे, निवडून येण्यापेक्षा आपण त्या पदाला कशा पद्धतीने न्याय देतो हे महत्वाचं आहे असेही माजी आमदार जगताप म्हणाले.
जत मधील काँग्रेस पक्षाच्या थापेबाजी, लबाडपणाचा योग्यवेळी समाचार घेणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. कर्नाटकातील पाणी जत तालुक्याला येणार म्हणून त्याकरीता तत्कालीन काँग्रेस सरकारने दहा कोटींचा निधी मंजूर केला असल्याचे काँग्रेसने कांगावा केला होता. हा निधी कुठे गेला आहे.
पावसाचे पाणी पूजन करून तुबची बबलेश्वर योजनेचे पाणी असल्याचे सांगून तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम काँग्रेसने केले असल्याचे यावेळी माजी आमदार जगताप यांनी सांगितले.