आमदार नाना पटोले म्हणाले चिपळुणातील महापुराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी

आमदार नाना पटोले म्हणाले चिपळुणातील महापुराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी
Published on
Updated on

चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : चिपळुणात आलेला महापूर नैसर्गिक आपत्ती असली, तरी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी आपल्याकडे आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखाव्या लागतील, यासंदर्भात निवेदन दिले जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई, माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आ. हुस्नबानू खलिफे प्रदेश सरचिटणीस इब्राहीम दलवाई, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, पत्रकार युवराज मोहिते, प्रभारी मनोज शिंदे, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्दे शहराध्यक्ष लियाकत शाह आदी उपस्थित होते.

चिपळुणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बुधवारी रात्री ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी श्री. नाना पटोले म्हणाले की, अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी, नागरिक, व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून जीवित हानीही झाली आहे. चिपळूण शहरासह 18 गावे बाधित झाली आहेत.

शासनाने कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. ही मदत भरपूर आहे, असे मान्य करत नाही. तरीही मागील नैसर्गिक आपत्तीच्या वेळीची मदत पाहता ही भरीव मदत केली गेली आहे.

चिपळूण दौर्‍यादरम्यान व्यापार्‍यांशी संवाद साधत असताना विमा कंपन्या या व्यापार्‍यांना त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत प्रांतांना काही सूचना केल्या आहेत.

यामध्ये विमा कंपन्यांना तातडीने नोटीस काढणे तसेच वेळप्रसंगी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच काळ्या यादीत टाकण्याचे अधिकार त्यांना आहेत, असे नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पूरग्रस्तांची संवाद साधत असताना नदीतील गाळ उपसला गेला नसल्याचे या वेळी पूरग्रस्तांनी सांगितले तसेच प्रशासनानेही आम्हाला अलर्ट केले नाही, अशा तक्रारी केल्या आहेत.

यामुळे चिपळुणात आलेल्या महापुराची उच्चस्तरीय चौकशी व भविष्यात या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय योजना आखाव्यात आदी मागण्या काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

प्रदेशाध्यक्षांचा दौरा यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news