भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत सलामीवीर केएल राहुल याने पहिल्या दिवशी नाबाद शतक ठोकले. त्याचे हे ३८ कसोटी सामन्यातील सहावे कसोटी शतक आहे. केएल राहुलच्या बॅटमधून तब्बल तीन वर्षांनी कसोटी शतक आले आहे. पण, हे शतक ऐतिहासिक असे शतक आहे.
केएल राहुलने भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पावलावर पाऊल ठेवले. रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये लॉर्ड्सवर शतक झळकावले होते. भारताकडून एका सलामीवीराने लॉर्ड्सवर शतक ठोकण्याचा विक्रम रवी शास्त्री यांच्या नावावर नोंदवला गेला होता. आता केएल राहुल लॉर्ड्सवर शतक झळकावणारा भारताचा दुसरा सरामीवीर ठरला आहे.
याचबरोबर केएल राहुल लॉर्ड्सवर १४४ वर्षापासून रिक्त राहिलेली जागा भरून काढली. आजपर्यंत लॉर्ड्सवर एक ते पाच क्रमाकांच्या फलंदाजांनी शतक झळकावले होते. याला अपवाद फक्त क्रमांक दोनच्या फलंदाजाचा होता. आता राहुलने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत नाबाद शतक झळकावून तो अपवादही संपवला. केएल राहुल रोहित शर्मा सोबत सलामीला आला होता. तो दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
या सामन्यात केएल राहुल ऐवजी रोहित शर्माच भारताकडून लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दुसरा सलामीवीर ठरला असता. मात्र जेम्स अँडरसनने त्याचा ८३ धावांवर असताना त्रिफळा उडवला. त्यामुळे संथ सुरुवात करणाऱ्या केएल राहुलला हा मान मिळाला.
भारताने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दमदार सुरुवात केली. रोहित आणि राहुलने १२६ धावांची धडाकेबाज सलामी दिली. ६९ वर्षानंतर भारतीय सलामीवीरांनी लॉर्ड्सवर शतकी भागीदारी केली. त्यानंतर मात्र अँडरसनने भारताला दोन धक्के दिले. त्याने रोहितला ८३ धावांवर तर पुजाराला ९ धावांवर बाद केले.
हे दोघेही बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुलने ११७ धावांची भागीदारी रचत भारताला २६७ धावांपर्यंत पोहचवले. पण, दिवस संपायला काहीच वेळ शिल्लक असताना रॉबिन्सनने विराटला ४२ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिला दिवस संपला त्यावेळी भारताच्या ३ बाद २७६ धावा झाल्या होत्या. राहुल १२७ धावा करुन नाबाद होता तर अजिंक्य रहाणे १ धाव करुन नाबाद होता.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : कणखर सह्याद्रीत दरडी का कोसळत आहेत?