लंडन : प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांच्या शाही विवाह सोहळ्यातील अधिकृत केक्सपैकी एका केकच्या तुकड्याचा आता लिलाव करण्यात आला आहे. या तुकड्याला लिलावात तब्बल 1850 पौंड म्हणजेच सुमारे 1,90,585 रुपयांची किंमत मिळाली.
चार्ल्स आणि डायना चा हा विवाह सोहळा एखाद्या परिकथेसारखा आजही सांगितला आणि ऐकला जातो. या सोहळ्यास चाळीस वर्षे झाल्यावरही त्याबाबतचे कुतुहल व लोकप्रियता कायम असल्यानेच या केकच्या तुकड्याला इतकी किंमत मिळाली आहे.
या शाही विवाह सोहळ्यात 23 अधिकृत केक होते. त्यापैकी एका केकचा हा तुकडा आहे. या केकची आयसिंग वैशिष्ट्यपूर्ण होते आणि बदामाच्या मिठाईपासून बनवण्यात आलेला बेस शाही 'कोट ऑफ आर्म्स'ला सोनेरी, लाल, निळ्या आणि रूपेरी रंगात सजवले होते. हा तुकडा त्यावेळी 'क्वीन मदर'च्या स्टाफमधील एक सदस्या मोया स्मिथ यांना देण्यात आला होता.
तो त्यांनी कठीण पकड असलेल्या एका फिल्ममध्ये सुरक्षित ठेवला होता व त्यावर 29 जुलै 1981 ही तारीख लिहिली होती. एका जुन्या केक टीनमध्ये त्यांनी हा तुकडा ठेवला होता व त्याच्या झाकणावर लिहिले होते 'सावधगिरीने स्पर्श करा.
यामध्ये प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या लग्नाचा केक आहे'. त्यांच्या कुटुंबीयांनी हा तुकडा 2008 मध्ये एका संग्राहकाला विकला. आता झालेल्या लिलावात तो गेरी लेयटन यांनी खरेदी केला आहे.