डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत महिला बळी : आरोग्य यंत्रणा सतर्क | पुढारी

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा मुंबईत महिला बळी : आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण देणार्‍या डेल्टा प्लस व्हेरिएंटची मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढत असतानाच मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी गेल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जीनोम सिक्वेसिंगमधून बुधवारी समोर आलेल्या 7 रुग्णांपैकी एका जेष्ठ महिलेचा कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेने जाहीर केले. ही महिला फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. घरी असताना तिला ऑक्सिजनची आवश्यकता लागली होती. त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. रुग्णालयात भरती केल्यानंतर 27 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. या महिलेचा स्वाब जिनोम सीक्वेन्सिंग अहवाल आल्यानंतर तिला डेल्टा व्हेरियंटची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

मुंबईत 6 डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण होते. त्यात बुधवारी आयजीआयबी प्रयोगशाळेच्या अहवालातुन आणखी 7 जणांची भर पडली. आणि मुंबईतील डेल्टा व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या 11 वर पोहचली. त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे डॉ. गोमारे म्हणाल्या.

राज्यात 80 टक्केहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असून, आतापर्यंत डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे. यात 32 पुरुष, तर 33 स्त्रिया आहेत. सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत.

यामध्ये 18 वर्षांखालील 7 रुग्ण असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत. या महिन्याच्या अखेरीस किंवा सप्टेंबरमध्ये येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेला कोरोनाचा डेल्टा प्लस अवतारच कारणीभूत असेल, असे तज्ज्ञांचे मत असल्यामुळे या व्हेरिएंटची वाढत चाललेली रुग्णसंख्या धोक्याची घंटा ठरावी.

Back to top button