भूकंपाचा इशारा देणारे मोबाईल अ‍ॅप विकसित | पुढारी

भूकंपाचा इशारा देणारे मोबाईल अ‍ॅप विकसित

नवी दिल्ली : भूकंपाच्या धोक्याबाबत उत्तराखंड विशेष रूपाने संवेदनशील क्षेत्र मानला जातो. याठिकाणी भूकंपाचा धोका नेहमीच भेडसावत असतो. आता आयआयटी रुडकीने भूकंपाचा इशारा देणारे मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. ‘उत्तराखंड भूकंप अ‍ॅलर्ट’ असे या अ‍ॅपचे नाव आहे. भूकंपाची पूर्वसूचना देणारे हे देशातील पहिलेच अ‍ॅप आहे.

हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध आहे. भूकंपाची पूर्वसूचना मिळवण्यासाठी यूजरला केवळ हे अ‍ॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे असते. या इन्स्टॉलेशनसाठी काही गरजेची माहिती नोंदवावी लागते. अ‍ॅपमध्ये एक माहिती देणारा व्हिडीओही आहे.

भूकंपाच्या वेळी स्वसंरक्षणासाठी काय काय करावे याची माहिती यामध्ये क्रमबद्धरीत्या देण्यात आलेली आहे. हे अ‍ॅप उत्तराखंडमधील पाचपेक्षा अधिक तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपाचीच पूर्वसूचना देतो. अ‍ॅपवर इशार्‍याचे संकेत इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचतात. त्यासाठी यूजरला इंटरनेटशी कनेक्ट राहावे लागते.

अर्थात हे अ‍ॅप डेटाचा वापर केवळ भूकंपाची सूचना देण्यासाठीच करते. ते भूकंपाचा ‘रिअल टाईम’ इशारा देते. त्याच्या मदतीने भूकंपाच्या धक्क्यांचा सुरुवातीलाच छडा लागू शकतो आणि जोरदार धक्का बसण्यापूर्वीच सार्वजनिक इशार्‍याद्वारे लोकांना सावध केले जाऊ शकते.

त्याचा भौतिक आधार भूकंपाच्या लहरींची गती आहे जी फॉल्ट लाईनमध्ये वेगाने स्ट्रेस रिलीजवर फैलावते. याच लहरींमुळे जमीन हादरते. तिची गती सुरुवातीच्या लहरींच्या निम्मी असते आणि ती विद्युत चुंबकीय संकेतांपेक्षा अतिशय धीम्या गतीने वाढते. अ‍ॅपचे तंत्र त्याचाच लाभ घेऊन भूकंपाचे पूर्वसंकेत देते.

Back to top button