मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना आणखी एक धक्का बसला आहे. पुणे येथील भोसरी एमआयडीसी भूखंड खरेदी गैर व्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील तब्बल 5 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना 2016 मध्ये त्यांनी पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथे 3.1 एकर प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला. यात 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना म्हणजे रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना खडसे यांनी 12 एप्रिल 2016 रोजी बैठक बोलावली.
जमीन उकानींना परत द्यावी की, त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचा दावा केला जातो. पुढे उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते.
दरम्यान, ईडीने याप्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने एकनाथ खडसे यांची याप्रकरणी चौकशी केली असून त्यांच्या पत्नी आणि जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती.
तसेच, खडसेंच्या कन्या अध्यक्षा असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला नोटीस बजावून संत मुक्ताई साखर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रे मागविली आहेत.