राज्यपाल भगतसिंह कोश्यारी-राज्य सरकार भेट आता १ सप्टेंबरला | पुढारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी-राज्य सरकार भेट आता १ सप्टेंबरला

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेट नाकारली हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आरोप अखेर राजकीय वावडी असल्याचे स्पष्ट झाले. राज्यपालांनी राज्य सरकारला 1 सप्टेंबरची वेळ भेटीसाठी दिली आहे.

राज्यातील महविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांची केलेली शिफारशींची फाईल गेले अनेक महिने राजभवनावर प्रलंबित आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपालांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारच्या बैठकीत म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने राज्यपालांची वेळ घेतली नव्हती.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारच्या कार्यक्रमातही या भेटीची नोंद नव्हती. राज्य सरकारकडून राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले.

असे असताना राज्यपालांनी भेट नाकारली, असा आरोप पटोले यांनी केला. राज्यपाल भाजपच्या हायकमांडच्या आदेशानुसार चालत आहेत. इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना यातून भविष्यात आमदार बनविण्याची भाजपची चाल आहे, त्यामुळे गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राज्यपालांनी भेट नाकारली आहे, असे पटोले म्हणाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी माजी संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या जीवनावर आधारित “एक मनोहर कथा” या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लेखिका मंगला खाडिलकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या नियोजित कार्यक्रमांशिवाय मुख्यमंत्र्यांना गुरुवारी भेटीची वेळ दिलेली नव्हती, असे राजभवनातून सांगण्यात आले.

नार्वेकर राजभवनावर…

दरम्यान, राज्यपालांनी भेट नाकारली असे वृत्त हे वृत्तवाहिन्यांवर सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर गेले. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भेटीचा निरोप सांगितला. 1 सप्टेंबरला राज्यपालांच्या भेटीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महविकास आघाडीचे नेते जाणार असून, राज्यपालांनी 1 सप्टेंबरचीच वेळ दिल्याचे सांगण्यात आले.

Back to top button