Latest

इन्स्टा व्हिडीओ बनविणाऱ्याला रेल्वे पोेलिसांनी शिकवला धडा

backup backup

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : भरधाव रेल्वे गाडी शेजारी आणि रेल्वेच्या रुळांवर इन्स्टा व्हिडीओ बनविणे, एका तरूणाला चांगलेच महागात पडले आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) इन्स्टा व्हिडीओ बनविणार्‍या तरूणाला ताब्यात घेऊन चांगलाच दम भरला. त्यासोबतच त्याचा आणखी एक व्हिडीओ बनवून त्यालाच रेल्वेच्या रूळांवर व्हिडीओ तयार करणे, किती धोकादायक आहे, हे त्याच्याच फोलोअर्सला सांगायला लावले.

आदर्श मनोज शुक्ला मुंबईतील विठ्ठलवाडी येथील तरूण आहे. त्याने भरधाव रेल्वेच्या शेजारी आणि रुळांवर बसून व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अन तो रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजेच आरपीएफच्या हाती लागला.

आरपीएफकडून या तरूणाला शोधून काढून त्याला चांगलाच दम भरण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर आणि रेल्वे रूळांच्या जवळ व्हिडीओ बनविल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. आणि त्यालाच इतर तरूणाईमध्ये जनजागृती होण्यासाठी व्हिडीओ बनवायला लावले.

या तरूणाने अधिकार्‍यांची माफी मागत, त्याच्या असलेल्या फॉलोअर्सनी देखील अशा प्रकारचे व्हिडीओ बनवू नयेत, असे व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले.

रेल्वे पोलिसांचा चांगलाच धडा

आजकाल तरूणाईला इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यासाठी व्हिडीओ बनविण्याचे वेडच लागलेले असते.

कोणी एसटीसमोर, एसटीच्या आतमध्ये, कोणी मोठ-मोठ्या डोंगर दर्‍यांवर, कोणी बाईकवर तर कोणी भररस्त्यातच व्हिडीओ बनवितो. आणि इन्स्टाग्रामवर अपलोड करतो. अन ते फक्त जादा लाईक्स, व्युवर्स आणि कमेंटसाठीच.

असेच व्हिडीओ बनविताना अनेक तरूणांचा यापूर्वी अपघाती मृत्यू झाले आहेत. मात्र, तरी देखील या आजच्या वेड्या तरूणाईला काही फरकच पडत नाही. असाच व्हिडीओ रेल्वेसमोर आणि रेल्वेच्या रुळांवर बनविणार्‍या तरूणाला रेल्वे पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT