इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
आर्थिक व्यवहारातून खासगी प्रकल्प सल्लागाराला दोरीने बांधून चाकू व अडकित्ता यांचा धाक धाकवत तब्बल 35 लाख 30 हजाराची खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजी येथे शनिवारी उघडकीस आला.
या प्रकरणी इचलकरंजी नगरपालिकेच्या नगरसेविकेचा पती मदन सीताराम जाधव (रा. दातार मळा) याच्यासह 6 जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी मुस्ताक अहमद मन्सूर मुजावर (वय 44, रा. सांगली रोड) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मुजावर हे खासगी प्रकल्प सल्लागार आहेत. शासनाच्या विविध योजनांतून उभारण्यात येणार्या संस्थांचे प्रस्ताव ते तयार करतात. यापूर्वी दोन संस्थांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. यावेळी काही आर्थिक व्यवहार झाले होते. याबाबत मुजावर आणि जाधव यांच्यात वाद निर्माण झाला होता. या वादातूनच मदन जाधव यांनी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता मुजावर यांना फोनवरून सीए आल्याचे सांगून आपल्या घरातील कार्यालयात बोलावून घेतले. तिथे जाधव यांच्यासह अमोल बळीराम अरसूर (रा. दातार मळा), प्रणव पाटील, अनिकेत, पाटील व एक अनोळखी व्यक्ती होती.
मदन जाधव याने आपले मेहुणे अभिजित व अमोल यांचे मुजावर याच्यामुळेच नुकसान झाल्याचा गैरसमज करून घेतला. चर्चेवेळी जाधव याने मुजावर यांच्याकडे 55 लाख रुपये देण्याची मागणी केली तसेच त्यांना मारहाण केली. अनिकेत व अनोळखी व्यक्तीने मुजावर यांचे हातपाय दोरीने बांधून ठेवले. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला. मुजावर यांना अडकित्त्याने बोटे कापण्याची धमकी देऊन मोबाईलचा पासवर्ड घेण्यात आला. मुजावर यांच्या गळ्याला चाकू लावून धमकावून त्यांच्या मोबाईलवरून रक्कम देण्यासाठी सतत भावाबरोबर संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मुजावर यांच्या दिलशाद गारमेंट या संस्थेची 25 लाखांची ठेव मोडून ती बँकेच्या चालू खात्यावर ट्रान्फसर करण्यात आली. त्यानंतर एकूण 33 लाख रुपये चंद्रकला बळीराम ग्रुपच्या एका सहकारी बँकेमधील खात्यावर ट्रान्सफर करण्यात आली. अमोल अरसूर यास दोन लाखांची रोकड तर गुगल पे वरून 30 हजार रुपये असे एकूण 35 लाख 30 हजार रुपये मुजावर यांच्याकडून जबरदस्तीने मारहाण करीत काढून घेण्यात आले. याचवेळी मुजावर यांना संशयितांनी जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.
या घटनेनंतर मुजावर यांनी आज शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने जाधव याच्यासह संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे दिवसभर चौकशी सुरू होती. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच राजकीय नेत्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे. मुख्य संशयित जाधव हा नगरसेविकेचा पती आहे. त्यामुळे पोलिसांनी जाधव याला ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दरम्यान, संशयित आरोपी जाधव याने मुजावर यांच्यासह त्यांची पत्नी व वडील मन्सूर यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.