Latest

TDM : जबरदस्त टिझरचा धुमाकूळ; चित्रपट यादिवशी होणार रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी कहाणी असलेला 'टीडीएम' हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरपासूनच या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली होती. आता नुकताच या चित्रपटाचा संभ्रमात पाडणारा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. (TDM) ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखले जाते. ख्वाडा आणि बबन चित्रपटाच्या यशानंतर विशेष म्हणजे कॉमेडी जॉनर घेऊन भाऊराव पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत असून या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील ते करणार आहेत. 'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत तर निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित 'टीडीएम' या आगळ्यावेगळ्या नावाच्या सिनेमातून भाऊराव ३ फेब्रुवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. (TDM)

टिझरमध्ये आपण पाहू शकता की पिळदार शरीरयष्ठी असलेला तरुण मुलगा जड काम करतोय. खाणीत एकट्याने काम करून गाळलेला घाम, कोणाही व्यक्तीची त्याला मदत दिसत नाही. टिझर पाहून हा चित्रपट वास्तविकतेचे दर्शन घडवणार असे काहीसे वाटतंय. त्यात विशेष म्हणजे चित्रपटाचा टिझर आला असला तरी मुख्य नायकाचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही. त्यामुळे चित्रपटात कोण कोण असणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ही चित्रपटाची कथा इमोशनल वा प्रॅक्टिकल नेमकी कुठे वळण घेणार हे ही अद्याप स्पष्ट होत नाही. त्यामुळे चित्रपटात विशेष असे काय असणार याचा अंदाज लागत नाही. हा एक आपल्या गावाशी नाळ जोडणारा चित्रपट आहे इतके मात्र नक्की.'

भाऊराव कऱ्हाडे असे म्हणाले की, "'बबन' चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी मी नवीन सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय, मधल्या काळात लॉकडाऊनमुळे सिनेमात एकंदरीतच मनोरंजन क्षेत्रात बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यामुळे बराच काळ गेला. पण आता प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. तुमच प्रेम, आशीर्वाद सदैव माझ्यावर आहेत. तीन फेब्रुवारी २०२३ ला आम्ही घेऊन येतोय तुमचा सिनेमा 'टीडीएम'. अपेक्षा करतो की माझ्या मायबाप प्रेक्षकांना हा उत्कंठावर्धक टिझर नक्कीच भावेल. तुमच्या आवडीच्या गोष्टी लवकरच पडद्यावर आणू."

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्याकडे आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT