पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याज दरामध्ये होणार वाढ | पुढारी

पोस्ट ऑफिस बचत योजनांच्या व्याज दरामध्ये होणार वाढ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांसह इतर अल्प बचत योजनांत गुंतवणूक करणार्‍यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससीवरील व्याज दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. किसान विकास पत्रावरील व्याज दर 6.9 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे. याआधी किसान विकास पत्रामधील गुंतवणूक 124 महिन्यांनंतर व्याजासह हाती येत होती. आता हाच कालावधी 123 महिने असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज दर 7.4 टक्क्यांवरून 7.6 टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यावरील व्याज दरातही वाढ करण्यात आली आहे. या योजनेवरील व्याज दर 6.6 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला आहे.

पोस्ट ऑफिसच्या योजना

पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐेवजी 5.7 टक्के व्याज मिळणार आहे. तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दर 5.5 टक्क्यांवरून 5.8 टक्के करण्यात आला आहे. एका वर्षाच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा व्याज दर 5.5 टक्के आहे. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनांवरील व्याज दरातही बदल झालेला नाही. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.8 टक्के व्याज मिळते.

तूर्तास व्याज दर ‘जैसे थे’

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अर्थ मंत्रालयाने पब्लिक प्रॉव्हिडंड फंड, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनांवरील व्याज दरात कोणताही बदल केला नाही. पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यातील गुंतवणुकीवरील व्याज दरही ‘जैसे थे’ म्हणजे चार टक्के आहे.

Back to top button