शिक्रापूर : जातेगावच्या शेतकर्‍याची आठ लाखांची फसवणूक | पुढारी

शिक्रापूर : जातेगावच्या शेतकर्‍याची आठ लाखांची फसवणूक

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: जातेगाव बुद्रुक येथील एका शेतकर्‍याला कारखान्यासाठी ऊसतोड कामासाठी कामगार पुरवितो, असे सांगत तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी युगराज हंसराज पवार व महादेव युगराज पवार (दोघे रा. रोकडे, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) या दोघांवर शिक्रापूर पोलिसांनी फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. जातेगाव बुद्रुक येथील शेतकरी हनुमंत मोरे यांचा शेतीसह कारखान्याची ऊसतोड करून कारखान्याला देण्याचा व्यवसाय आहे.

मोरे यांना नेहमी ऊस तोडणीसाठी कामगार लागत असल्याने ते विविध ठिकाणहून कामगार आणतात. त्यांच्या व्यवसायातून युगराज पवार व महादेव पवार यांच्यासोबत ओळख झाली होती. पवार यांनी मोरे यांना तुम्हाला ऊसतोड कामगार आणून देतो, त्यांना देण्यासाठी उचल द्यावी लागेल असे म्हणून तब्बल 8 लाख रुपये घेतले.

त्यांनतर आज कामगार येतील, उद्या कामगार येतील असे म्हणत कामगार पुरविण्यास टाळाटाळ केली; मात्र काही केल्या पवार यांनी कामगार पुरविले नाहीत. तसेच मोरे यांचे पैसे देण्यातदेखील टाळाटाळ करू लागले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हनुमंत सुनील मोरे (वय 31, रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष मारकड करीत आहेत.

Back to top button