Raj Kundra Pornography case | राज कुंद्राचे सीबीआयला पत्र, पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकवल्याचा मुंबई पोलिसांवर आरोप | पुढारी

Raj Kundra Pornography case | राज कुंद्राचे सीबीआयला पत्र, पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकवल्याचा मुंबई पोलिसांवर आरोप

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक आणि नंतर सुटका (Raj Kundra Pornography case) झालेल्या बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने आता या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत राज कुंद्रा याने सीबीआयकडे लेखी पत्र पाठवले आहे. त्यात त्याने मुंबई गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पॉर्नोग्राफी प्रकरणात आपल्याला अडकवल्याचा गंभीर आरोप केला आहे. एका व्यावसायिकाने सूडबुद्धीने मुंबई पोलिसातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या प्रकरणात आपल्याला अटक केल्याचाही त्याने दावा केला आहे.

राज कुंद्राने सीबीआयला पाठवलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावे घेतली आहे. यासोबतच त्याने पंतप्रधान कार्यालयालादेखील पत्र लिहून याप्रकरणी न्याय मि‍ळवून देण्याची मागणी केली आहे. पॉर्न चित्रपट बनवणे आणि कोणत्याही आरोपीशी आपला काहीही संबंध नाही. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मूळ आरोपपत्रात त्याचे नाव नसतानाही पोलिसांनी त्याला या प्रकरणात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदारावर आपल्याविरुद्ध जबाब देण्यासाठी दबाव टाकण्यात आला, असेही कुंद्रा याने म्हटले आहे.

कुंद्राने आपल्या पत्रात सीबीआयला म्हटले आहे की, ते साक्ष देणाऱ्या अनेक साक्षीदारांचे तपशील शेअर करू शकतात. कुंद्राच्या तक्रारीनुसार, ज्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरुन आपल्याला पॉर्नोग्राफी प्रकरणात कथितरित्या अडकवण्यात आले त्या व्यावसायिकाविरुद्ध आपले वैयक्तिक मतभेद आहेत. त्याचे पोलिसांशी चांगले संबंध आहेत. सूडबुद्धीने आपल्यावर कारवाई करण्यात आली.

कुंद्राने तक्रारीत पुढे म्हटले आहे की मी एक वर्ष गप्प राहिलो. मला न्यायालयाकडून न्याय हवा आहे. त्याने या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी असलेला रायन याला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तब्बल ६२ दिवसांनी कुंद्राची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. तर मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा विरोधात १५०० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यासह ४३ साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे. (Raj Kundra Pornography case)

हे ही वाचा :

Back to top button