कोंढवा : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळ्यांची शर्यत! | पुढारी

कोंढवा : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळ्यांची शर्यत!

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: शाळेतील पाण्याच्या टाक्यांचे तुटलेले नळ, मुलींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव, सभागृहात कोरोना काळातील खाटा व गाद्यांचा पडून असलेला खच, फुटलेली सांडपाणी वाहिनी आदी समस्यांना येथील संत गाडगे महाराज शाळेतील विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने याकडे त्वरित लक्ष द्यावे; अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

पुणे शहरातील सर्वात मोठी मनपा शाळा म्हणून कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेकडे पाहिले जाते. या शाळेत जवळपास 4 हजार 500 विद्यार्थी दोन शिफ्टमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेला विद्यार्थ्यांच्या पालकांसह माजी स्वीकृत नगरसेवक संजय लोणकर, अक्षय मदन शिंदे, नितीन लोणकर, प्रवीण लोणकर, संजय वांजळे, नीलेश ढोणे, लक्ष्मण लोणकर यांनी अचानक भेट दिली. त्या वेळी झालेली दुरवस्था पाहून त्यांनी शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले.

शाळेच्या मुख्य हॉलमध्ये (सभागृह) कोविड सेंटरच्या खाटा व गाद्या अजूनही पडल्या आहेत. त्यावर माश्या व डास घोंगावत असून उग्र वासही येत आहे. शाळेचा आवार अस्वच्छ असून, ड्रेनेजची दुर्गंधी येत आहे. या शाळेत मुलींची संख्या जवळपास दोन हजारांच्या वर आहे. पण त्यांना स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नाही. शाळेतील जिने अस्वच्छ आहेत. मुलांना मधल्या सुटीत जेवणासाठी योग्य व्यवस्था नाही.

विद्यार्थी ज्या पाण्याच्या टाकीवर पाणी पितात, त्या टाकीचे नळ तुटलेले आहेत. सध्या नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनावर कुणाचाच वचक नाही. मुलांच्या बाबतीत हेळसांड होत असून, याला जबाबदार कोण, असा प्रश्न या वेळी पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षकांनी सांगितले की, शाळेमध्ये आलेली अडचण आम्ही तातडीने वरिष्ठांना कळवत असतो. त्यावर अंमलबजावणीदेखील त्वरित केली जाते. शाळेत असलेल्या विविध समस्यांबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविले आहे. या समस्या लवकरच दूर केल्या जातील.

संत गाडगे महाराज शाळा ही कोंढवा गावची शान आहे. मात्र, या शाळेत विद्यार्थ्यांचे हाल होताहेत हे पाहून धक्काच बसला. शाळेत सध्या विविध समस्या असूनही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने नागरिकांशी चर्चा करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात; अन्यथा शाळेला टाळे ठोकण्यात येईल.

                                                 – संजय लोणकर, माजी स्वीकृत नगरसेवक

संत गाडगे महाराज शाळेच्या मुख्य हॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या खाटा व गाद्या कुणी ठेवल्यात त्याची प्रथमत: चौकशी केली जाईल. त्यानंतर त्या तातडीने हलविण्यात येतील आणि विद्यार्थ्यांना हा हॉल मोकळा करून दिला जाईल.

                                                             – दिलीप पावरा, अधिकारी, महापालिका

 

Back to top button