Latest

IPL Prize 2022: आज विजेता संघ होणार मालामाल, जाणून घेऊयात स्‍पर्धेमधील विविध बक्षीसांची रक्‍कम

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ चा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज (दि.२९) सायंकाळी आहे. जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या अंतिम सामन्यात विजय मिळवून विजेतेपदाचा करंडक उंचावण्यास दोन्ही संघ उत्सुक असतील. दरम्यान, विजेत्या संघाला किती बक्षीस  (IPL Prize 2022) मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यंदा बक्षिसाच्या रकमेत बरेच बदल करण्यात आले आहेत. यंदा आयपीएलचा विजेता संघ मालामाल होणार आहे. त्याचबरोबर उपविजेत्या संघालाही भरघोस बक्षीस मिळणार आहे. तर जाणून घेऊयात स्‍पर्धेमधील विविध बक्षीसांची रक्‍कम…

विजेत्या संघाला २०२२ मध्ये २० कोटी रुपये बक्षीस (IPL Prize 2022) म्हणून मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावरील संघ आरसीबीला ७ कोटी मिळणार आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला म्हणजेच लखनौला ६.५ कोटी मिळतील.

विजयी संघ – २० कोटी

उपविजेता संघ – १३ कोटी

क्रमांक ३ संघ – ७ कोटी

चौथ्या क्रमांकाचा संघ – ६.५ कोटी

गेल्या चार वर्षांपासून विजेत्या संघाला २० कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाते. यावेळी उपविजेत्या संघाला गतवर्षीपेक्षा ५० लाख रुपये जास्त मिळणार आहेत. २०२१ मध्ये उपविजेत्या संघाला १२.५ कोटी मिळाले हाेते.

याशिवाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप (IPL ऑरेंज, पर्पल कॅप 2022) जिंकणाऱ्या क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. आयपीएल पर्पल कॅप जिंकणाऱ्या क्रिकेटपटूला १५ लाख, तर ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या क्रिकेटपटूला १५ लाख मिळणार आहेत. याशिवाय आयपीएल २०२२ च्या उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपयांचे घसघशीत बक्षीसही दिले जाणार आहे.

दरम्यान, यंदाच्या मौसमात गुजरातच्या संघाने आपल्या पदार्पणाच्या आयपीएलमध्येच अंतिम फेरी गाठून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्याचबरोबर १४ वर्षांनंतर दुसऱ्यांदा राजस्थानचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. २००८ च्या आयपीएल फायनलमध्ये राजस्थानने शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या अंतिम सामन्यात धडक मारून विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी संघाला ४.८ कोटी रुपये विजेतेपदाच्या रूपात मिळाले होते, तर उपविजेत्या संघ चेन्नईला २.४ कोटी मिळाले होते. तर दुसरीकडे सोशल मीडियावर आयपीएल फायनलबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह, कमेंट्स आणि मीम्स पाहायला मिळत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT