Latest

सातारा : बामणोली येथील जवान शहीद; ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले होते सैन्यदलात

मोनिका क्षीरसागर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जावली तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ गावचे जवान प्रथमेश संजय पवार (वय 22) यांना कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री साडेदहाच्या सुमारास वीरमरण आले. त्यांचे पार्थिव उद्या (रविवारी) बामणोली तर्फ कुडाळ गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रथमेश संजय पवार हे तीन महिन्यांपूर्वीच सैन्यदलात भरती झाले होते. सीमा सुरक्षा दलात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच पवार यांनी पाहिले होते. ते स्वप्न वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पूर्ण केले. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी भरती झालेले प्रथमेश पवार यांनी देशासाठी बलिदान दिले.

शहीद प्रथमेश यांचे मावसभाऊ अमोल गंगोत्रे (रा. बामणोली तर्फ कुडाळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे रोजीच्या रात्री जवान प्रथमेश पवार हे जम्मू सांबा ब्लॉक परिसरात डयुटीला होते. त्यावेळी अचानक दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना प्रथमेश यांना गोळी लागली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

शहीद प्रथमेश पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण घेतले होते. प्राथमिक शिक्षण बामणोली तर्फ कुडाळ येथे झाल्यानंतर बारावीपर्यंत पाचवड येथील विद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सैन्यदलात त्यांचे सिलेक्शन झाले. सैन्यदलात दाखल होऊन तीन महिने झाले असतानाच देशसेवा बजावताना प्रथमेश यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT