पटणा, पुढारी ऑनलाईन : बिहारमध्ये गुरुवारी अचानकपणे आलेल्या वादळी पावसामुळे राज्याच्या १६ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून ३३ लोकांचा मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत्यू झालेल्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत करण्याची घोषणा केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विट करून मृतांसंबंधी दुःख व्यक्त केले आणि मदतीचे आश्वासन दिले आहे.
बिहारमधील वादळी पावसात कोसळलेल्या विजेमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हणाले, "बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. परमेश्वर मृतांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती देईल. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासनाकडून मदतीचे कार्य केले जात आहे."
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे. नितीश कुमार यांनी ट्विट करत म्हणाले की, "राज्याच्या १६ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज कोसळल्यामुळे ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे, ही अत्यंत दुखद घटना आहे. मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."
बिहारच्या भागलपूर परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहेत. तिथे वीज कोसळल्यामुळे ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरनगरमध्ये ६ लोकांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी अचानकपणे झालेल्या हवामान बदलामुळे वादळ-वाऱ्यांसहीत पाऊस झाला. त्यामुळे जागोजागी झाड उन्मळून पडली, तर विजेचे खांबदेखील कोसळले.
पहा व्हिडीओ : जंगलातील पाणवठ्यावरील एक संध्याकाळ
हे वाचलंत का?