आम्हाला आमची मुले जिवंत द्या! परवानगी नसताना मुलं बाहेर गेलीच कशी? विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश

आम्हाला आमची मुले  जिवंत द्या! परवानगी नसताना मुलं बाहेर गेलीच कशी? विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांचा आक्रोश
Published on
Updated on

हनुमंत देवकर

महाळुंगे इंगळे : चासकमान धरणात बुडून चार विद्यार्थ्यांचा गुरुवारी (दि. 19) दुर्दैवी अंत झाला. हे चारही मृतदेह चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता, 'आम्हाला आमची मुले जिवंत द्या,' असा टाहो नातेवाइकांनी शाळा प्रशासनापुढे फोडला. त्यांचा हा आक्रोश मन सुन्न करणारा होता. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथील तिवई हिलवर सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आहे. येथील मुले निवासी आहेत. मात्र, आमची मुले निवासी राहून शिक्षण घेत असल्याने शिक्षकांनी पालकांची परवानगी न घेता मुलांना धरणावर नेले. या घटनेस शाळा प्रशासन जबाबदार आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतला. या घटनेचा सखोल तपास केला जाईल, असे आश्वासन पालकांना पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिले.

परीक्षित कुलदीप अग्रवाल (वय 16, रा. दिल्ली), नव्या प्रज्ञेश भोसले (वय 16, रा. खारघर, नवी मुंबई), रितीन डी. धनशेखर (वय 16, रा. ई. रोड, तमिळनाडू) आणि तनिषा हर्षद देसाई (वय 16, रा. निसर्ग हौसिंग सोसायटी, बावधन, पुणे) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. परीक्षितच्या मागे आई, वडील व एक मतिमंद भाऊ आहे. रितीन हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तनिषाच्या मागे आई-वडील व मोठी बहीण आहे. याबाबतची माहिती विनायक अशोक शर्मा (वय 28, रा. सह्याद्री स्कूल, के. एफ. आय, तिवई हिल, गुंडाळवाडी, वाडा रोड, राजगुरुनगर, ता. खेड; मूळगाव रा. फ्लॅट नं. 7, ग्राउंड प्लोअर, शिवगंगा होम्स, बँक कॉलनी, उत्तराहल्डी, बंगळुरू, कर्नाटक) यांनी दिली.

खेडचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव, महिला पोलिस उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, विविध ठिकाणच्या चार विद्यार्थ्यांचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनासाठी त्यांचे पालक तसेच नातेवाईक आल्याने त्यांंनी केलेला आक्रोश टाहो फोडणारा होता. यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.

विद्यार्थी बाहेर गेलेच कसे?

हे विद्यार्थी धरणाजवळ असलेल्या डोंगरावरील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या सह्याद्री स्कूलचे विद्यार्थी आहेत. ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा असून, देश-विदेशांसह परराज्यांतील अनेक उच्चभ्रू वर्गातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळेचा स्वतंत्र डोंगरावर पूर्णतः विस्तीर्ण परिसर असून, नजीकच्या गावातील कुणाचाही या विद्यार्थ्यांशी व प्रशासनाशी संबंध येत नाही. तसेच शालेय प्रशासनाने बंदी घातलेली असतानाही शाळेच्या परिसरातून हे विद्यार्थी परस्पर बाहेर गेलेच कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

शवविच्छेदनाला अधिकारी उपस्थित

खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, पोलिस निरीक्षक सतीश गुरव, चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदा ढवळे, सहायक पोलिस निरीक्षक लाड, नानगट, श्रीमती घाटे, मंडलाधिकारी गणेश सोमवंशी, तलाठी श्याम वालेकर, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर, पत्रकार लहू लांडे यांनी रात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेपर्यंत उपस्थित राहून चारही विद्यार्थ्यांचे शवविच्छेदन करून त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news