Latest

मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी केला मोठा खुलासा

दीपक दि. भांदिगरे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राजीनामा द्यावा लागला. राजीनाम्यासाठी माझ्यावर कोणाचाच दबाव नव्हता; परंतु शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेत मी स्वत:हून राजीनामा दिला, असे स्पष्टीकरण माजी मंत्री आ. संजय राठोड यांनी दिले.

दरम्यान, विरोधकांनीही अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा दिला होता. घटनेची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर यावे म्हणून मी राजीनामा दिल्याचेही ते म्हणाले.

बंजारा समाजाच्या सहविचार सभेच्या निमित्ताने आमदार राठोड हे रविवारी सोलापुरात आले होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

राठोड म्हणाले, राज्यात बंजारा समाजाची लोकसंख्या सुमारे दीड कोटींपर्यंत आहे. 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 72 मतदारसंघांत समाजाची निर्णायक ताकद आहे. समाजाच्या मागण्या पूर्ण होतील, या आशेने आमचा लोकशाही मार्गाने लढा सुरू आहे.

बंजारा समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्याय मिळालेला नाही. समाजातील तरुणांच्या भवितव्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे 25 मागण्या घेऊन आम्ही दौरे करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारच्या अखत्यारितील मागण्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितला असून त्यांनी लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन दिल्याचेही ते म्हणाले.

समाजाच्या प्रमुख मागण्या…

व्हीजेएनटीचे स्वतंत्र मंत्रालय असावे; समाजासाठी स्वतंत्र सबलीकरण योजना असावी. बंजारा समाजासह 14 जातींसाठी स्वतंत्र एससी-बी प्रवर्ग तयार करावा. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये बंजारा समाजासाठी प्रत्येकी 20 जागा असाव्यात.

बार्टी, सारथीच्या धर्तीवर वसंतराव नाईक यांच्या नावाने स्वतंत्र संस्था उभारावी. परदेशी शिक्षण व इंग्रजी शाळांमधील प्रवेशात समाजासाठी विशिष्ट जागा असाव्यात. वसंतराव नाईक महामंडळाला एक हजार कोटी द्यावेत; तांडा वस्ती सुधार योजनेत बदल करावा, अशा बंजारा समाजाच्या मागण्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा :

अभिनेत्री सनी लिओनीच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापणा (फोटोज)

[visual_portfolio id="36908"]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT