चीन करतो आठवड्याला दोन कोटी डासांची उत्पत्ती | पुढारी

चीन करतो आठवड्याला दोन कोटी डासांची उत्पत्ती

बीजिंग : चीन हा देश असा आहे की, तो केव्हा काय आणि कशाची निर्मिती करेल, हे सांगता येणे अशक्य आहे. डास हे अनेक आजारांचे कारण आहेत. यामुळे या डासांचा समूळ नायनाट करण्यासाठी जगभरात अनेक उपाय अमलात आणले जातात. मात्र, चीनमध्ये चक्क एक कारखानाच असून तेथे आठवड्याला तब्बल दोन कोटी डासांची उत्पत्ती केली जाते. उल्लेखनीय म्हणजे हे डास उपद्रवी नसून ते उपयोगी आहेत. या डासांचे मुख्य काम म्हणजे दुसर्‍या डासांविरुद्ध लढाई करून आजार रोखणे, हे आहे.

डासांमुळे होणार्‍या आजारांमुळे दरवर्षी जगभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू होतो. पावसाळ्याच्या दिवसात तर डेंग्यूचा प्रकोप सर्वत्र पाहावयास मिळतो. अशा उपद्रवी डासांना नष्ट करू शकणार्‍या डासांची निर्मिती करण्यासाठी चीनने एक कारखानाच सुरू केला आहे. या कारखान्यात तयार होणारे डास आजार पसरविणार्‍या डासांचा नाश करतात. हे चांगले डास उपद्रवी डासांची उत्पत्ती रोखण्याचेच काम करतात. चीनने हा कारखाना एका संशोधनांती सुरू केला आहे.

चीनच्या दक्षिण भागातील गुआंगझोऊमध्ये एक मोठी फॅक्टरी आहे. तेथे या चांगल्या डासांची निर्मिती केली जाते. दर आठवड्याला सुमारे दोन कोटी डास या फॅक्टरीत तयार होतात. हे प्रामुख्याने वोलबेचिया बॅक्टेरियाने संक्रमित असतात. चीनच्या सून येत सेत युनिव्हर्सिटी आणि मिशिगन युनिव्हर्सिटीच्या संयुक्त संशोधनात असे आढळून आले की, वोलबेचिया बॅक्टेरियाने संक्रमित असलेले डास तयार केल्यास ते आजार पसरविणार्‍या डासांना नंपुसक बनवू शकतात. यामुळेच चीनने या डासांची निर्मिती सुरू केली.

Back to top button