Latest

आरआरआर : राम चरण, ज्यु. एनटीआरला ‘नाटू नाटू’ची एक स्टेप करायला लागले १८ दिवस

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

प्रसिध्द दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा सर्वात महागडा आणि बहुप्रतिक्षित चित्रपट RRR आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हे दोन भारतीय क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांचा ब्रिटिश राजवटी आणि हैदराबादच्या निजामाविरुद्धच्या युद्धावर आधारित आहे. या चित्रपटात रामचरण अल्लुरीच्या भूमिकेत आहे आणि ज्युनियर एनटीआर कोमाराम भीमच्या भूमिकेत आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात अजय देवगण आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ५५० कोटींचा बजेट असणारा हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास ४ वर्षे लागली. तुम्हाला माहितेय का, नाटू नाटू या चित्रपटातील गाण्यासाठी राम चरण आणि एनटीआर ज्युनिअरला बरीच मेहनत घ्यावी लागली. अचूक स्टेप्स करण्यासाठी दोघांनी तब्बल १८ दिवस घालवले. जाणून घेऊया या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान घडलेले काही मनोरंजक किस्से.

असे पडले चित्रपटाचे नाव

सुरुवातीला या चित्रपटासाठी राजामौली यांनी वेगळे नाव ठेवले होते. नंतर कोणीतरी सुचवले की, चित्रपटाच्या टायटलसाठी रामचरण आणि रामाराव या दोन्ही स्टार्सच्या आणि दिग्दर्शकाच्या नावाचे पहिले अक्षर का घेऊ नये. आरआरआर हे सोशल मीडियावर आल्यावर चाहत्यांना आणि वितरकांना ते नाव खूप आवडले. नंतर हेच नाव सगळीकडे ठेवले.

अचूक स्टेप्स करायला लागले १८ दिवस

या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच ते लोकप्रिय ठरले. राम चरण आणि एनटीआर ज्यु. यांच्या डान्सने सर्वांचीच मने जिंकली. 'नाटू नाटू' हे गाणे युक्रेनमधील कीव्हमध्ये शूट करण्यात आले आहे. या गाण्याशी संबंधित एक रंजक किस्सा म्हणजे या गाण्याच्या स्टेप्स अचूक करण्यासाठी दोन्ही कलाकारांना एका दिवसात १२ तास शूट करावे लागले. एक एक स्टेप्स परफेक्ट होण्यासाठी त्यांना जवळपास १५ ते १८ दिवस लागले. अखेर खूप मेहनतीनंतर हे गाणं शूट झालं आणि लोकांना हे गाणं खूप आवडलं.

ज्युनियर एनटीआर जंगलात अनवाणी धावला

चित्रपटात जंगलाचा सीक्वेन्स दाखवला जाणार होता. राजामौली यांनी खऱ्या शूटिंगच्यावेळी एनटीआर ज्यु.ला आश्चर्यचा धक्का दिला. एनटीआरने शूज घालून सीनचा सराव केला होता. पण खऱ्या सीनच्या शूटिंग दिवशी क्रिएटिव्ह पॉवर हाऊसच्या दिग्दर्शकाने त्याला बुल्गेरियाच्या काटेरी जंगलात अनवाणी धावण्याची सूचना केली. एनटीआर ज्युनियरला कोणतीही दुखापत झाली नाही. पण, त्याच्या पायाला काटे आणि धारदार दगडे टोचली होती.

एसएस राजामौली चित्रपटाच्या कास्टिंगपासून चिंतेत होते, की आलिया आल्यानंतर या दोन कलाकरांना नियंत्रणात कसे ठेवायचे? आलिया सेटवर आल्यावर एनटी रामाराव ज्युनियर आणि राम चरण दोघेही सेटवर खूप दंगा मस्ती करायचे. पण शूटिंगदरम्यान दोघांच्या मस्तीमुळे सेटवरचे वातावरण सकारात्मक झाले.

राम चरण क्वचितच सेटवर आलियाशी बोलायचा

आलियाने तिच्या दोन्ही सहकलाकारांविरोधात तक्रार केली होती. राम चरण तिच्याशी फारसं बोलत नाही. आलियाने हे राम चरणला विचारल्यावर त्याने गोंडस उत्तर दिले की, 'तू खूप सुंदर आहेस म्हणून मला लाज वाटायची.' राम चरणच्या या स्मार्ट उत्तरानंतर आलियाची बोलती बंद झाली होती.

SCROLL FOR NEXT