शिवाजी तरूण मंडळची बाजी

शिवाजी तरूण मंडळची बाजी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीने रंगलेला शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने तुल्यबळ ठरला. मात्र स्पर्धेतील 7 सामन्यांपैकी 4 विजय, एक पराभव व दोन बरोबरी करत सर्वाधिक 14 गुणांच्या बळावर शिवाजी तरुण मंडळाने 'केएसए' लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

सामन्याचा प्रारंभ 'केएसए'चे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी 'केएसए'चे चिफ पेट्रन शाहू महाराज, 'विफा' च्या महिला अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे, आमदार ऋतुराज पाटील, 'केएसए'चे सचिव माणिक मंडलिक यांच्यासह पदाधिकारी, पोलिस अधिकारी उपस्थित होते.

अटीतटीचा सामना

शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम याच्यातील सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद व आक्रमक खेळाचा अवलंब करण्यात आला. पूर्वार्धात पाटाकडीलचे वर्चस्व होते. आघाडीसाठी त्यांच्याकडून खोलवर चढाया सुरू होत्या. ओंकार पाटीलचा फटका गोलपोस्टवरून गेला. ऋषिकेश मेथे-पाटीलने हेडरद्वारे चांगला प्रयत्नकेला. रोहित देसाईच्या पासवर ऋषिकेशचा चांगला प्रयत्न अपयशी ठरला. ओंकार जाधवची फ्री किक शिवाजीचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेने सुरेखरीत्या रोखली. शिवाजीकडून करण चव्हाण बंदरे, सुयश हंडे, रणवीर जाधव यांच्या चढाया अपयशी ठरल्या. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.

उत्तरार्धातील सामन्यावर शिवाजी मंडळची पकड होती. करण चव्हाण बंदरेने केलेल्या खोलवर चढाईत चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला. कार्नरवर रोहन अडनाईकने हेडरद्वारे चांगला प्रयत्न केला. जय कामत व शुभम साळोखे यांची संयुक्त चढाई
अपयशी ठरली. शिवाजीकडून बचावपटू विशाल पाटील व गोलरक्षक मयुरेश चौगुले यांनी झकास खेळाचे प्रदर्शन केले.

पोलीस कडून 'पीटीएम' ब पराभूत

तत्पूर्वी दुपारच्या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने पाटाकडील तालीम मंडळ 'ब' संघाचा 3 विरुद्ध 2 अशा निसटत्या गोलफरकाने पराभव केला. सामन्यात पोलिसच्या विशाल पाटील याने सलग तीन गोल्ससह हॅट्ट्रिक केली. सामन्याच्या 27, 29 आणि 48 व्या मिनिटांना त्याने हे गोल केले. पाटाकडीलकडून पूर्वार्धात 21 व्या मिनिटाला साहिल भोसलेने तर उत्तरार्धात 75 व्या मिनिटाला निशांत पवारने गोल लगावले. पण नंतर त्यांना गोल नोंदवता आला नाही.

प्रचंड बंदोबस्त

शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील यांच्यातील सामन्याची उत्सुकता तमाम फुटबॉलप्रेमींना लागून राहिली होती. सोशल मीडियावरून दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून विविध प्रकारच्या पोस्टस् व्हायरल केल्या जात होत्या. सामना शांततेत व खिलाडूवृत्तीने खेळला जावा यासाठी पोलिस प्रशासन व दोन्ही संघांच्या पदाधिकार्‍यांकडून सतत प्रबोधन सुरूच होते. दरम्यान, सामन्यादिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मैदानात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात पोलिस दलासह व्हाईट आर्मीचे सुरक्षा रक्षक दिवसभर मैदान परिसरात सज्ज होते. मैदानाभोवतीच्या सर्व रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते. वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता वाहतूक पोलिसांची धावपळ झाली.

छत्रपती शाहू स्टेडियम खचाखच

कोरोनामुळे सुमारे दोन वर्षे कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम ठप्प होता. कोरोनाचा कहर कमी झाल्याने कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम यंदा पूर्ववत सुरू झाला आहे. हंगामाच्या प्रारंभी महापौर चषकाचे उर्वरित दोन सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात आले. यानंतर मात्र 'केएसए' लीग स्पर्धेसाठी फुटबॉलप्रेमींना सामना पाहण्याची परवानगी मिळाली. यामुळे 'केएसए' लीग स्पर्धेला फुटबॉलप्रेमींचे प्रोत्साहन व पाठबळ वाढतच गेले. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यातील चुरस अधिकच वाढल्याने सामन्यांना अफाट गर्दी होऊ लागली. गुरुवारी शिवाजी मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम यांच्यात स्पर्धेच्या अजिंक्य पदासाठीचा सामना होणार असल्याने दुपारी 12 वाजल्यापासूनच फुटबॉलप्रेमी मैदानात जमू लागले होते. दुसरा सामना सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण मैदान खचाखच भरले होते.

शिवाजी पेठेत जल्लोष

तब्बल 19 वर्षांनंतर लीग विजेते ठरलेल्या शिवाजी मंडळाने जल्लोषात आपला विजय साजरा केला. सामना संपल्यापासून रात्री उशिरापर्यंत शिवाजी पेठेत उत्साहाला उधाण आले होते. शिवाजी तरुण मंडळच्या दारात तिरंगी ध्वजासह सर्वांनी गुलालाची उधळण करत हलगीवर ठेका धरला. घोषणाबाजी आणि आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

आज बक्षीस समारंभ

दरम्यान, केएसए लीग फुटबॉल स्पर्धेची सांगता शुक्रवारी (दि.25) बक्षीस समारंभाने होणार आहे. यावेळी 'केएसए' चे चीफ पेट्रन शाहू महाराज, अध्यक्ष मालोजीराजे, 'विफा'च्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी, दुपारी 2 वाजता,
खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध जुना बुधवार पेठ यांच्यात तर सायंकाळी 4 वाजता, प्रॅक्टिस क्लब विरुद्ध फुलेवाडी मंडळ यांच्यात सामने होणार आहेत.

फुटबॉलवेडे शहर!

कोल्हापूर : क्रिकेटवेड्या देशात फुटबॉलला अंमळ जास्तच पसंती देणारे शहर ही कोल्हापूरची ओळख गुरुवारी अधिकच अधोरेखित झाली. शहरात दोन दर्जेदार संघ एक शिवाजी मंडळ आणि दुसरा पीटीएम. या दोन्ही संघाचे रांगडे चाहते मैदानात सातत्याने सोशल मीडियावरून विविध संदेशांचे आदानप्रदान करताना दिसत होते. सोशल मीडियावर याच सामन्याची मौज दिसून आली. तुडुंब भरलेल्या शाहू स्टेडियमचे फोटो, गोल झाल्यानंतरचा जल्लोष, आपल्या मंडळाच्या प्लेअरने मारलेला डॉज फुटबॉलप्रेमींकडून क्षणाक्षणाला सोशल मीडियावर शेअर केला जात होता.

स्टेडियम खच्चून भरलंय… लवकर ये…. असे स्टेटस लावत फुटबॉलप्रेमींनी हा सामना पाहण्यासाठी अफाट गर्दी केली होती. फेसबुक, इन्स्टाग्रामसह स्नॅपचॅटवर मंडळ आणि पीटीएम यांच्यातील चुरस पाहायला मिळत होती. या हाय होल्टेज मॅचच्या निकालनंतर सोशल मीडियावर स्टेटस, व्हिडीओ, पोस्टचा पाऊस सुरू झाला होता. केएसए चषक मिरजकरी तिकटी मार्गे शिवाजी पेठेत आल्याचे स्टेटस लावत फुटबॉलप्रेमींचा एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न सुरू होता. याशिवाय शिवाजी पेठेत आज दिवाळी अशा पोस्ट लावत फुटबॉलप्रेमींकडून सोशल मीडियावरही जल्लोष साजरा करण्यात येत होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news