दानपेटीत चलनबाह्य नोटांचा बंडल! | पुढारी

दानपेटीत चलनबाह्य नोटांचा बंडल!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दानपेटीत चलनबाह्य 500 रुपयांच्या नोटांचा बंडल गुरुवारी आढळला. भाविकांनी चलनबाह्य नोटा दानपेटीत टाकू नयेत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी यावेळी केले. दर दोन महिन्यांनी होणारी दानपेटींची मोजणी यावेळी मार्च महिन्यामुळे लवकर करण्यात आली. दानपेटीत परदेशी चलनी नोटाही मिळाल्या आहेत.

अंबाबाई मंदिराच्या दानपेटीच्या मागील मोजणीत सुमारे दीड कोटींचे दान जमा झाले होते. नोटा-नाण्यांबरोबरच मौल्यवान दागिने, वस्तूंचाही यात समावेश असतो. गुरुवारच्या मोजणीत 1 कोटी 48 लाख 8 हजार 819 रुपयांचे दानपेटीत जमा झाल्याचे
आढळले.

तोफांच्या चाचणीस परवानगी मिळणे बाकी

दरम्यान, अंबाबाई व जोतिबा देवालयांतील जुन्या-खराब तोफांना पर्यायी तोफा देवस्थानने ताब्यात मिळवल्या आहेत. तोफांसाठी लाकडी गाडेही तयार करण्यात आले आहेत. लवकरच तोफांची चाचणी होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळणे बाकी आहे. ती मिळाल्यावर एक-दोन दिवसांत तोफा उडविण्याची चाचणी घेऊन तोफा जोतिबा व अंबाबाई मंदिराच्या सेवेत दाखल होणार आहेत.

फरशी काढण्याचे काम लवकरच सुरू

अंबाबाई मंदिराचे मूळ सौंदर्य खुले व्हावे यासाठी आतील भिंत, जमिनीवर जागोजागी लावण्यात आलेल्या संगमरवरी फरशा काढण्याच्या कामास परवानगीची मागणी करण्यात आली आहे. दोन दिवसांत ती मिळाल्यावर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती नाईकवाडे यांनी दिली.

Back to top button