Latest

Rinkoo Rahee : माफियांनी ७ गोळ्या झाडल्या, एक डोळा गमावला, UPSC क्रॅक केलेल्या रिंकू राहींची प्रेरणादायी गोष्ट

दीपक दि. भांदिगरे

मेरठ; पुढारी ऑनलाईन

जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे उत्तर प्रदेशातील २००७ बॅचचे प्रांतीय नागरी सेवा (provincial civil service) अधिकारी रिंकू सिंह राही (Rinkoo Singh Rahee) यांनी करुन दाखवले आहे. त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक केली आहे.

२००९ मध्ये रिंकू सिंह यांनी १०० कोटींचा स्कॉलरशीप घोटाळा उघडकीस आणला. यामुळे ते माफियांच्या (mafia) निशाण्यावर आले. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या या अधिकाऱ्यावर ७ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे त्यांना आपला एक डोळा गमवावा लागला. चेहरा विद्रुप झाला. त्यांना ऐकू न येण्याचीही समस्या निर्माण झाली. त्यावेळी ते केवळ २६ वर्षांचे होते. तरीही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांनी अनेक समस्यांचा सामना करत यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. यावेळी त्यांना यूपीएससी परीक्षेत ६८३ वी रँक मिळाली आहे.

UPSC मध्ये काही विशेष श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट आहे; ज्याची राही यांना मदत झाली. त्यांची २००८ मध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये समाजकल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पण त्यांच्यावर माफियांनी हल्ला केला. या हल्ला प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चौघांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

राही यांच्या चेहऱ्यावर तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचा चेहरा विद्रूप झाला. एका डोळ्याने त्यांना अंधत्व आले. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली. तेव्हाच त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. अनेक समस्यांचा सामना करत त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. सध्या त्यांचे वय ४० आहे.

"माझ्या कठीण काळात मी व्यवस्थेशी लढत नव्हतो. यंत्रणा माझ्याशी लढत होती. मी चार महिने रुग्णालयात होतो. पण माझी वैद्यकीय रजा आजपर्यंत मंजुरीसाठी प्रलंबित' आहे," असे राही यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हटले आहे.

राही (Rinkoo Singh Rahee) यांनी पुढे सांगितले की तत्कालीन मायावती सरकारच्या कार्यकाळात माझ्यावर हल्ला झाला होता. मला समाजवादी पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरोधात अधिक कडक भूमिका घेतल्याने मनोरुग्णालयातही पाठवण्यात आले होते.

"माझे वडील १० वर्षांचे असताना माझे आजोबा वारले. माझ्या आजीला सासरच्या लोकांनी घरातून हाकलून दिले होते. तिला जगण्यासाठी घरातील स्वच्छतागृहे (toilets) स्वच्छ करण्याचे काम करावे लागले. माझे वडील अभ्यासात हुशार होते. पण कुटुंबाची गुजराण करण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावले लागले. मी हा सर्व संघर्ष, शोषण बघतच मोठा झालो. मला वाटत होते की जर सरकारी अधिकारी प्रामाणिक असते तर आम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळू शकला असता. या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास झाला आणि मी प्रशासकीय अधिकारी होण्याचा निर्णय घेतला."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT