सांगली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत (UPSC Result 2022) सांगलीतील प्रतीक नंदकिशोर मंत्री यांनी देशात 252 वा, तर इस्लामपूरच्या अजिंक्य बाबुराव माने (मूळ रा. नेर्ले) यांनी देशात 424 वा क्रमांक मिळविला. यशाचा झेंडा फडकविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतीक मंत्री हे मूळचे सांगलीचे आहेत. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे शाळेतून घेतले. वाई येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील आयसीटीमधून त्यांनी 'पॉलिमर' या विषयातून बी.टेक पदवी घेतली आहे. (UPSC Result 2022)
शालेय शिक्षणापासून अधिकारी बनण्याचे स्वप्न प्रतीक यांनी उराशी बाळगले होते. मुंबई येथून पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासाची (UPSC Result 2022) सुरुवात केली. पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपयश आले तरी खचून न जाता त्यांनी जोमाने अभ्यास करून तिसर्या प्रयत्नात देशात 252 वा क्रमांक पटकाविला आहे. सोमवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच मंत्री यांच्या कुटुंबात जल्लोष सुरू झाला. सर्व स्तरातून प्रतीक व त्यांचे वडील व्यावसायिक नंदकिशोर मंत्री यांना फोनवरून शुभेच्छा देण्यात येत होत्या.
तसेच अजिंक्य माने यांचे माध्यमिक शिक्षण आदर्श हायस्कूल, इस्लामपूर, बीई मेकॅनिकल आर.आय.टी. राजारामनगर येथे झाले आहे.
एम.टेक्. पूर्ण करून काही वर्षे अजिंक्य यांनी नोकरी केली होती. गेली तीन वर्षे अजिंक्य हे यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होते. तिसर्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे.
आपल्या यशात आई-वडील यांचे प्रोत्साहन, मोठे दोन भाऊ यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले, असे मत अजिंक्य यांनी व्यक्त केले. अजिंक्य याचे आई-वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. भाऊ अमितकुमार माने हे इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. थोरले बंधू जर्मनीत मोठ्या कंपनीत अधिकारी आहेत.