सरुड (कोल्हापूर) : चंद्रकांत मुदूगडे
साळशी (ता. शाहूवाडी) येथील आशिष अशोक पाटील या ग्रामीण भागातील तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC Result 2022) ५६३ वी रँक मिळवली आहे. यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेतील 'शाहूवाडी पॅटर्न'चा डंका वाजला आहे. विशेषतः आशिष याने मराठी माध्यमातून शिक्षण घेतले असून इंग्रजी भाषेची निवड करून युपीएससी परीक्षेला सामोरे जात हे लख्ख यश मिळवले आहे. आईवडिलांचे संस्कार आणि गुरूंनी दाखविलेला मार्ग हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे मत यशस्वी परीक्षार्थी आशिष पाटील याने दै. पुढरीशी बोलताना व्यक्त केले आहे.
साळशी (ता. शाहूवाडी) या मूळ खेडेगावात वाढलेला आशिष हा अशोक बाळू पाटील या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा मुलगा आहे. कडवे केंद्रातील वीरवाडी शाळेत प्राथमिक शिक्षणाचे धडे घेताघेता आशिष (UPSC Result 2022) याने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक पटकावून आपल्यातील गुणवत्तेची चुणूक दाखविली होती.
सुपात्रे हायस्कूलमध्ये पूर्व माध्यमिक टप्प्यावर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही राज्याच्या यादीत अग्रक्रमाने झळकला होता. तर महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे दहावी शालांत परीक्षेत (सन २०१३) ९७ टक्के गुण प्राप्त केले होते. याचवेळी आशिषने सातत्यपूर्ण यशाचा आलेख उंचावत 'एनटीएस'या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवले आणि शिक्षण पूर्ण करेपर्यंत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा तो लाभधारक बनला. (UPSC Result 2022)
पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात १२ वी तसेच कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शासकीय महाविद्यालयातून 'इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन' विषयातून विशेष श्रेणीतून पदवी (२०१९) मिळवली. मात्र भरभक्कम पगाराच्या नोकरीची चांगली संधी मिळूनही आशिषने स्पर्धापरिक्षेचा मार्ग निवडला. (UPSC Result 2022)
दरम्यान यशाची ही भूक मंदावणार नाही याची काळजी घेणाऱ्या आशिष याला 'अभ्यासाला बस' असा सल्ला कधीही द्यावा लागला नसल्याचे त्याचे पालक सांगतात. निश्चित केलेले ध्येय गाठण्यासाठी त्याची कठोर परिश्रमाची तयारी पाहून पालकांनी युपीएससी मार्गदर्शन वर्गासाठी त्याला दिल्ली येथे दाखल केले. येथे चार महिने सराव केला, आणि पुन्हा व्हाया पुणे आणि कोरोना काळात गावी येऊन स्वअध्ययनाचा मार्ग धरणारा आशिष २०२० ची नागरी सेवा पुर्व परीक्षा पास झाला.
मात्र मुख्य परीक्षेत त्याला थोडक्यात अपयश आले. मात्र दुसऱ्या प्रयत्नात आशिषने हे अपयश धुवून काढत युपीएससी परीक्षेत ५६३ रँक प्राप्त करून यशाला गवसणी घातली. या यशामध्ये गृहिणी असणारी आई, वडील अशोक पाटील (एम. ए. इंग्रजी), माध्यमिक शिक्षक ए. ए. पाटील तसेच प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या मार्गदर्शक शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे शेवटी आशिष याने सांगितले.
'यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, हे सुरुवातीपासून मनावर बिंबवले होते. त्यादृष्टीने ध्येय निश्चित केले आणि झपाटून तयारी सुरू केली. विशेषतः नागरी सेवा परीक्षेचे उपलब्ध साहित्य पाहता इंग्रजी भाषेचा पर्याय निवडून पूर्वतयारीने परीक्षेला सामोरा गेलो. साहित्य वाचनाचा छंदही यशामध्ये कामी आला.'
— आशिष पाटील (यशस्वी परीक्षार्थी, साळशी, ता. शाहूवाडी)