पुढारी ऑनलाईन डेस्क : एक निडर फलंदाज, प्रभावी शब्दांचा मारा करत प्रेक्षकांची थेट संवाद साधणारा समालोचक, हास्याचे फवारे उडवत आपल्या शेरोशायरीने कॉमेडी शोला नव्या उंचीवर घेवून जाणारा 'जज' आणि आपल्या प्रभावी वक्तृत्वाने प्रत्येक जाहीर सभा गाजविणारा राजकारणी, अशी अनेक विशेषणांचा बहुमान मिळालेले नाव म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू. एक क्रिकेटपटू निवृत्तीनंतर किती भूमिका करू शकतो, हे या व्यक्तिमत्त्वाला पाहिले की समजते. आज हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण त्यांनी आपले 'दबावतंत्रा'चे अस्त्र पुन्हा एकदा बाहेर काढले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू आणि बंड त्यांचे नाते जूने आहे. आज काँग्रेसची कोंडी करु पाहणारे सिद्धू यांनी थेट भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराविरोधात बंडाचा झेंडा फडकावला होता.
१९९६मध्ये भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या दौर्यावर होता. यावेळी सिद्धू यांनी थेट तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन याच्याविरोधात बंड केले. हा दौरा अर्धवट सोडून ते मायदेशी परतले होते. यावेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेने भारतीय क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली होती.
यावेळीही चर्चा होती की, विदेशी दौर्यावर गेलेल्या खेळाडूने संयम ठेवणे गरजेचे असते. कारण संबंधित खेळाडू हा विदेशात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतो. अशावेळी तुम्ही व्यक्तिगत संघर्षासाठी दौरा सोडून मायदेशी परत येणे हा संघाबरोबरच देशाचाही अवमान ठरतो, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र, या वेळी सिद्धू आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपल्या कृतीचे समर्थन करत राहिले.
क्रिकेटच्या मैदाना गाजवल्यानंतर सिद्धू यांनी राजकीय मैदान गाजविण्यास सुरुवात केली. पक्ष निवडला भाजप. २००४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. थेट संसदत एन्ट्री केली. या काळात त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक खटला सुरु होता. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ अरुण जेटली यांनी युक्तिवाद केला आणि सिद्धू यांना जामीन मिळाला.
संकटकाळात जेटली यांनी केलेल्या मदतीमुळे सिद्धू भारावले. त्यांनी जेटली हेच आपले राजकीय गुरु असल्याचे त्यांनी जाहीर केले. दहा वर्षांनंतर सारे बदललं. भाजपने अमृतसर मतदारसंघात सिद्धू यांना डावलत जेटली यांना उमेदवारी दिली. भाजपचा कयास होता की, जेटली यांना उमेदवारी दिली तर सिद्धू बंड करणार नाहीत.
भाजपचा बालेकिल्ला अशी अमृतसर मतदारसंघ ओळख होती. जेटली यांचा विजय सुकर व्हावा, यासाठी भाजपने हा सुरक्षित मतदारसंघ निवडला होता. मात्र भाजपचे सर्व अंदाज खोटे ठरवत सिद्धू यांनी बंडखोरी करत आपले गुरु जेटली यांचा प्रचार करणे टाळले. आपल्याला जे डावलतात त्यांना धडा शिकवाचाच, असा हा निर्धार त्यांनी केला होता.
त्याचा परिणाम असा झाला की, मोदी लाट असतानाही भाजपचा बालेकिल्ला असणार्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन अमरिंदर सिंग हे सुमारे एक लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले होते. यामागे सिद्धू यांची बंडखोरी कारणीभूत होती. कारण यापूर्वीच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता. या वेळी सोईनुसार राजकारण करण्याच्या त्यांच्या भूमिकेवर जोरदार चर्चा झाली होती.
अकाली दल या प्रादेशिक पक्षाबरोबर युती करुन भाजपने पंजाबमधील सत्ता काबीज केली. यावेळी अकाली दलाचे नेते आणि नवज्योतसिंग सिद्धू यांची राजकीय मैत्री ही आदर्श मानली जात असे. त्या काळात अकाली दलावर स्तुतीसूमने उधळत ही 'दोस्ती तुटायची नाय', असा दावा करत प्रचार काळात सिद्धू यांनी अख्खा पंजाब पालथा घातला होता.
मात्र, भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर त्यांनी अकाली दलावर तोफ डागण्यास सुरुवात केली. या पक्षाकडून सुरु असणारा भ्रष्टाचार, केबल माफिया, खाण उत्खनन आदी मुद्द्यांकडे त्यांचे अचानक लक्ष वेधले गेले. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्या पतीन नवजोत कौर या भाजपमध्ये होत्या. भाजपने त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. २०१६ मध्ये त्यांना राज्यसभा खासदार केले. मात्र भाजपबरोबरील मतभेद वाढल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात सिद्धू यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला.
सिद्धू यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. यानंतर ते आम आदमी पार्टीत प्रवेश करतील. तसेच आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही तेच असतील, अशी चर्चा सुरु झाली. त्यांची पक्षाबरोबर चर्चाही सुरु होती. मात्र २०१७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वार्याचा अचूक अंदाज घेत सिद्धू यांनी यापुढे काँग्रेससाठी 'बॅटिंग' करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. भाजप-अकाली दल युतीला पराभूत करत काँग्रेस सत्तेत आली.
पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येण्यात सिद्धू यांचा महत्वपूर्ण भूमिका होती. याचे बक्षीसही त्यांना मिळाले. त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. मात्र अमृतसर महापौर निवडणुकीवेळी त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर जाहीर टीका केली. यानंतर त्यांनी केबल नेटवर्कला देण्यात आलेला प्रस्तावही नामंजूर करण्यात आला.
२०१९ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्याचे मंत्रीपद बदलले. तसेच त्यांनी पाकिस्तानमधील कार्यक्रम जावू नये, असे आवाहन अमरिंदर सिंग यांनी केले होते. ते धुडकावत सिद्धू हवे वाघा बार्डरवरुन रस्तामार्गे पाकिस्तानला गेले. पाकिस्तान दौर्यावर असताना करत्तारपूर कॉरिडोर खुला करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जावेद बाजवा यांचीही त्यांनी भेट घेतली होती.
तेलंगणामधील एक प्रचार सभेत सिद्धू त्यांनी थेट अमरिंदर सिंग यांच्यावरच तोफ डागली होती. यावेळी ते म्हणाले होते की, पक्षात कॅप्टन अमरिंदर सिंग यांचेही कॅप्टन राहुल गांधी आहेत. यावर पंजाब काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारापासून सिद्धू अलिप्त होते. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितल्यानंतर त्यांनी भटिंडा मतदारसंघात प्रचार केला होता. काही महिन्यातच ते काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रीय झाले. काँग्रेसने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिली.
अमरिंदर सिंग यांनी त्यांना विरोध केला. या दोघांमधील राजकीय वाद इतका विकोपाला गेला की, अखेर अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. यानंतर सिद्धू यांच्यावर काँग्रेसची धुरा होती. मात्र, त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसलाच धक्का दिला. आता त्यांनी पुन्हा एकदा व्यक्तिगत कारणातूनच प्रदेशाध्यपद सोडल्याची चर्चा आता रंगली आहे.
मी अखेरपर्यंत सत्य आणि हक्काची लढाई लढणार आहे, असा दावा सिद्धू करत आहेत. मात्र त्यांचे सत्य कोणते आणि हक्क कोणते, हे त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे क्रिकेटपासून राजकारणापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नवज्योतसिंग सिद्धू हे आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी हे दबावतंत्राचा चपलख वापर केला आहे, अशी चर्चा त्यांच्या विरोधकांसह समर्थकांमध्येही रंगली आहे. फरक एवढाच की, प्रत्येक वेळी व्यक्ती असो की पक्ष हा वेगळा आहे. मात्र नवज्योतसिंग सिद्धू यांचा बंडखोर पवित्रा कायम राहिला आहे.
हेही वाचलं का?