punjab crisis : 'पंजाबमध्ये सध्या जे काही सुरु आहे, त्यामुळे केवळ पाकिस्तान खुश आहे' - पुढारी

punjab crisis : 'पंजाबमध्ये सध्या जे काही सुरु आहे, त्यामुळे केवळ पाकिस्तान खुश आहे'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : punjab crisis : पंजाबमध्ये सध्या ज्या घडामोडी सुरु आहेत, त्यामुळे आपण व्यथित झालो असून राज्यातील अस्थिरतेचा पाकिस्तान फायदा घेऊ शकतो, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनिष तिवारी यांनी व्यक्‍त केली आहे.

अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटविण्यात यश आल्यानंतर नवजोतसिंग सिध्दू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे गेल्या वर्षभरापासून अशांत बनलेल्या पंजाबमध्ये (punjab crisis) ताज्या राजकीय उलाढालीनंतर वातावरण ढवळून निघाले आहे.

बलिदान देणार्‍यांत काँग्रेसच्या लोकांची संख्या जास्त

पंजाबमध्ये मोठ्या मुश्किलीने शांतता प्रस्थापित झालेली आहे. 1980 ते 1995 या कालावधीत दहशतवादामुळे 25 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यातही बलिदान देणार्‍यांत काँग्रेसच्या लोकांची संख्या जास्त होती, असे तिवारी यांनी सोशल मीडीयाद्वारे सांगितले.

पंजाबमध्ये (punjab crisis) सध्या जे काही सुरु आहे, त्यामुळे केवळ पाकिस्तान खुश आहे, असे सांगून तिवारी पुढे म्हणतात की, पंजाब हे सीमेला लागून असलेले राज्य आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे आणि त्यामुळे सामाजिक बदल होत आहेत. अशा स्थितीत जर काही प्रकारचे षड्यंत्र सार्वजनिक होत असतील तर त्याचा राज्याच्या स्थिरतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

त्यांना पंजाब समजला नाही

ज्या लोकांकडे जबाबदारी देण्यात आली होती, त्यांना पंजाब समजला नाही, अशी टीका तिवारी यांनी सिध्दू यांचे नाव न घेता केली. निवडणुका हा एक विषय आहे तर देशाचे हित हा दुसरा विषय आहे. पंजाबमध्ये राजकीय स्थिरता स्थापन होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

अमरिंदर सिंग हे मोठ्या उंचीचे नेते आहेत. माझ्या दिवंगत वडिलांचे ते चांगले मित्र होते. शिवाय गेल्या कित्येक दशकांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आपल्या दृष्टीने कॅ. अमरिंदर सिंग हे सध्या चांगल्या स्थितीत आहेत. त्यांनी जे काही सांगितले ते आता सिध्द होत आहे. सध्याच्या परिस्थितीत पंजाब सुरक्षित हातात असणे आवश्यक असल्याचे मनीष तिवारी म्हणाले.

हे ही वाचलं का?

Back to top button