Latest

Marathwada flood : मराठवाड्यात पावसाचे थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला

दीपक दि. भांदिगरे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : Marathwada flood : मराठवाड्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे अक्षरश: अस्मानी संकट कोसळले. गेल्या अनेक वर्षात झाला नाही असा पाऊस कोसळल्याने विभागातील आठही जिल्ह्यात शेतांचे अक्षरश: तळे झाले आहे.

पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली. तसेच तलाव, धरणे ओव्हर फ्लो झाल्याने व नदीनाल्यांना आलेल्या पूरामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात अनेक जण घरांवर अडकल्याची घटना घडली आहे.

त्यासोबतच अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. मालमत्तांच्या नुकसानीसोबतच मराठवाड्यातील शेतमालांवर ओल्या दुष्काळाने घाला घातला आहे. चार जिल्ह्यांसह तब्बल १८२ मंडळात अतिवृष्टीची तर विभागात ६१.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यंदाच्या मौसमातील पावसाने सलग तिसऱ्यांदा मराठवाड्याला (Marathwada flood) झोडपले आहे. ऑगस्ट महिन्यात शेवटचे दोन दिवस तर सप्टेंबरच्या पहिल्या आणि आता शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने कहर केला आहे.

विभागातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरीप हंगामाचे पीक पुर्णत: वाहून गेले आहे. तर अनेक शेतांमध्ये तळे साचल्याने मका, कापूस, मूग, उडीद, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

विभागात सोमवारी मध्यरात्री १२.४५ वाजेच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सलग सात तास कोसळत राहिला आहे. त्यामुळे विभागातील बहुतांश मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यातून सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीनाल्यांना पूर आला आहे.

त्यामुळे औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर या सात जिल्ह्यात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. विभागातील ४२१ पैकी तब्बल १८२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाल्याने अनेक गावांना पाण्याचा वेडा पडला आहे. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला असून अनेक घराच्या छतावर अडकले आहे. त्यांच्या बचावाचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

शेकडो घरे पाण्यात

विभागातील १८२ मंडळांत अतिवृष्टी झाल्याने त्या ठिकाणचे शेकडे घरे पाण्यात आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मध्यरात्री सुरू झालेला हा पाऊस सकाळी उशिरापर्यंत अनेक मंडळात सुरूच होता. त्यामुळे पाणी ओसरून जाण्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना घराच्या छताचा आधार घ्यावा लागला.

घरांची पडघड, जनावरे गेली वाहून

विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर अनेकांची लहानमोठी जनावरे पावसाच्या पूरात वाहून गेली आहे. तर काहींची जनावरे मरण पावली आहेत.

६४ मंडळात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस

मराठवाड्यातील १८२ मंडळात अतिवृष्टी झाली असून त्यातील ६४ मंडळामध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर कजेमधील उसूफ मंडळात तब्बल २११ मिमी आणि होळमध्ये २०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचलं का ?

जोरदार पावसामुळे मराठवाड्याची दैना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT