जालना : वडीगोद्रीत ढगफुटी; गोदावरी, गल्‍हाटी नदीला पूर | पुढारी

जालना : वडीगोद्रीत ढगफुटी; गोदावरी, गल्‍हाटी नदीला पूर

वडीगोद्री (जालना), पुढारी वृत्तसेवा : पावसाचे रौद्र रूप पुन्हा एकदा दिसून येत आहे. काल (सोमवार) रात्री वडीगोद्रीत ढगफुटी झाली. या ढगफुटीत वडीगोद्री परिसरातील गोदावरी नदी, गल्हाटी नदीला पूर आला आहे. मांगणी, लेंडी नदी, चांदसुरा नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. वडीगोद्री मंडळात १३३ मिमी तर गोंदी मंडळात १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गल्‍हाटी नदीला पूर आल्‍याने आधीच्या पूर परिस्थितीने हैराण झालेल्या पिठोरी सिरसगाव, घुंगर्डे हादगावला पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या वारंवार होणाऱ्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकरी पुर्णतः हतबल झाला असून, त्यात पुन्हा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

शेती शिवारात कंबरे एवढे पाणी साचले असून, रस्त्यावरूनही पाणी वाहत आहे. परिसरातील या पावसामुळे परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पिके तर वाया गेलीच पण शेतातील मातीही या पावसात वाहून गेली आहे. यामुळे हजारो हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. उरले सुरले सर्व पीकही पाण्यात वाहून गेले आहे.

Back to top button