पुढारी ऑनलाईन डेस्क : गाझा शहरातील हॉस्पिटलवर मंगळवारी (दि.१७) रात्री उशिरा झालेल्या भीषण हल्ला हा दहशतवाद्यांनीच घडविला आहे, असा दावा करत इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दहशतवाद्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग जारी केले आहे. या ऑडिओमध्ये दहशतवादी गाझा हॉस्पिटलमध्ये स्फोट घडवून आणलेल्या रॉकेटबद्दल बोलत आहेत. (Gaza Hospital Attack)
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबत नाही आहे. युध्दाचा आजचा १८ वा दिवस. यामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूचे 4500 हून अधिक लोक मारले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आज तेल अवीव येथे इस्रायलशी एकजूट दाखवण्यासाठी जात आहेत. दरम्यान, मंगळवारी (दि.१८) रात्री उशिरा हमासने दावा केला की, इस्रायली सैन्याने गाझामधील एका रुग्णालयावर हल्ला केला, ज्यामध्ये आतापर्यंत 500 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन म्हणाले की, गाझामधील रानटी हल्ला इस्रायली लष्कराने नव्हे तर दहशतवाद्यांनी केला हे संपूर्ण जगाला कळले पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या मुलांना क्रूरपणे मारले, ते स्वतःच्या मुलांनाही मारतात असे ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की इस्लामिक जिहादच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या दिशेने चुकीचे गोळीबार केलेले रॉकेट प्रक्षेपणानंतर अपयशी ठरले आणि रुग्णालयावर आदळले. आता सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान गाझामधील कोणत्याही एका घटनेतील हॉस्पिटलमधील स्फोटातील मृतांची संख्या आतापर्यंत सर्वाधिक होती. त्यामुळे वेस्ट बँक, जॉर्डन आणि तुर्कीसह विस्तीर्ण प्रदेशात निदर्शने होवू लागली आहेत.
या लढाईमुळे मध्यपूर्वेत युद्ध वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. युनायटेड स्टेट्सने इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी विमानवाहू जहाजे पाठवली आहेत. तर इराण आणि तेहरानच्या लेबनीज प्रॉक्सी हिजबुल्लासह हमासच्या मित्रांनी गाझावरील नियोजित इस्रायली भू-हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे वचन दिले आहे.
मध्य गाझा येथील अल अहली रुग्णालयावर हा हवाई हल्ला झाला. गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असे त्याचे वर्णन केले जात आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने दावा केला होता की, इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरेबिक बॅप्टिस्ट हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला. या रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी आणि इतर पॅलेस्टिनी आश्रय घेत होते.
हेही वाचा