Stock Market Closing Bell | इस्राईल- हमास युद्धामुळे शेअर बाजार लाल चिन्हात बंद, ‘या’ कंपन्यांचे शेअर्स घसरले | पुढारी

Stock Market Closing Bell | इस्राईल- हमास युद्धामुळे शेअर बाजार लाल चिन्हात बंद, 'या' कंपन्यांचे शेअर्स घसरले

पुढारी ऑनलाईन : इस्राईल आणि हमास युद्धाचे (Israel-Hamas war) पडसाद आज जगभरासह भारतीय बाजारात उमटले. मध्य पूर्वेतील या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या उच्च व्याजदराच्या चिंतेमुळे गुंतवणूक धास्तावले आहेत. यामुळे आज सोमवारी भारतीय शेअर बाजारात दबाव दिसून आला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ६५,४३५ पर्यंत खाली आला. तर NSE वर निफ्टी ५० निर्देशांक १५० हून अधिक अंकांनी घसरून १९,४८० वर आला. त्यानंतर सेन्सेक्स ४८३ अंकांच्या घसरणीसह ६५,५१२ वर स्थिरावला. तर निफ्टी १४१ अंकांनी घसरून १९,५१२ वर स्थिरावला. आज सर्व क्षेत्रात विक्री दिसून आली. विशेषतः आज फायनान्सियल स्टॉक्सना फटका बसला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

दरम्यान, पॉवर, ऑइल अँड गॅस, ऑटो, पीएसयू बँक, मेटल, रियल्टी आणि कॅपिटल गुड्स १-३ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्‍क्‍याने आणि स्मॉलकॅप निर्देशांक १.७ टक्‍क्‍यांनी खाली आला.

सेन्सेक्स आज ६५,५६० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६५,४३४ पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एम अँड एम, बजाज फायनान्स, एसबीआय, टाटा स्टील, कोटक बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स घसरले. तर एचसीएल टेक, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वधारले.

निफ्टी ५० वर अदानी पोर्ट्स, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाईफ, एम अँड एम, बीपीसीएल हे शेअर्स २ ते ४.७५ टक्क्यांदरम्यान घसरले. तर डॉ. रेड्डीज, एचसीएल टेक, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स वाढले.

इस्राईल-हमास युद्धामुळे ‘या’ भारतीय कंपन्यांचे शेअर्स घसरले

इस्राईल-हमास युद्धाचा परिणाम आज काही भारतीय शेअर्सवरही दिसून आला. इस्राईलशी संबंध असलेल्या अनेक भारतीय कंपन्यांना याचा फटका बसला. इस्राईलमधील हैफा बंदराची मालकी असलेल्या अदानी पोर्ट्सचे शेअर्स सोमवारी बीएसईवर सुमारे ४ टक्क्यांनी घसरुन ७९४.१५ रुपयांच्या निचांकी पातळीवर आले. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला उत्तर इस्राईलमधील हैफा बंदर १.१८ अब्ज डॉलरला विकत घेतले होते.

इस्राईलच्या तारो फार्मास्युटिकलमध्ये हिस्सेदारी असलेल्या सन फार्मास्युटिकलचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी घसरले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), विप्रो, टेक महिंद्रा आणि इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) सारख्या कंपन्यांचेदेखील इस्राईलमध्ये अस्तित्व आहे. इस्राईलवरील हमासच्या आकस्मिक हल्ल्याने जेनेरिक औषध निर्माते, चिपमेकर, डायमंड प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर सेवा पुरवठादारांच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. याव्यतिरिक्त मध्यपूर्वेतील संघर्षाचा तेल विपणन कंपन्यांवर नकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. (Stock Market Closing Bell)

जी २० शिखर परिषदेत ज्याची घोषणा झाली होती त्या भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर बांधण्याच्या भारताच्या योजनेवर सध्या सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम होऊ शकतो. या भितीने IRCON, Jupiter Wagons, RVNL आणि IRFC सारखे रेल्वे शेअर्स प्रत्येकी ५-६ टक्क्यांदरम्यान घसरले. हा कॉरिडॉर रेल्वेशी संबंधित कंपन्यांसाठी तसेच जहाजबांधणी उद्योगासाठी महत्त्वाचा होता. यामुळे शिपिंग कॉर्पोरेशनचे शेअर्सही आज सुमारे ५ टक्क्यांनी घसरले.

हिरो मोटोकॉर्पही घसरले

दिल्ली पोलिसांनी हिरो मोटोकॉर्पचे (Hero MotoCorp) चे प्रमोचटर पवन मुंजाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्याच्या वृत्तानंतर Hero MotoCorp चे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. माहिती तंत्रज्ञान (IT) वगळता इतर सर्व १२ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी सोमवारी लाल रंगात व्यवहार केला.

कच्च्या तेलाचे दर वाढले

इस्राईल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यातील युद्ध संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर (Oil prices) आज वाढले. आज सोमवारी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल २.२५ डॉलरने वाढून ८६.८३ डॉलरवर पोहोचले. इस्राईल आणि हमास दहशतवादी यांच्यातील लष्करी संघर्षांमुळे मध्य पूर्वेतील राजकीय अनिश्चितता अधिक वाढली आहे. याचे पडसाद आज आशियाई बाजारात दिसून आले. (Oil prices) आज सुरुवातीच्या व्यवहारात ब्रेंट क्रूड सुमारे ४ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८७.६९ डॉलरवर गेले होते. त्यानंतर त्यातील घसरण काही प्रमाणात कमी झाली. (Stock Market Updates)

युरोप, आशियाई बाजारात दबाव

मध्य पूर्वेतील लष्करी संघर्षामुळे (conflict between Israel and Hamas) आज आशियाई बाजारात घसरण दिसून आली. आशियाई बाजारातील चीनचा शांघाय कंपोझिट (China’s Shanghai Composite) आणि हाँगकाँगचा हँग सेंग (Hong Kong’s Hang Seng) वर दबाव दिसून आला. युरोपीय बाजारातही हीच स्थिती राहिली.

हे ही वाचा :

Back to top button