पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या आणि केंद्रात बहुमत असलेल्या भाजपचे चार मुख्यमंत्री राजीनामा देत सहा महिन्यांत घरी गेल्याचे चित्र आहे. किंबहुना भाकरी परतण्यासाठी भाजपने त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे, असे राजकीय तज्ज्ञ म्हणतात.
उत्तराखंडमध्ये तर तीन महिन्यांसाठी मुख्यमंत्री करून पक्षाने पदाची संगीत खुर्चीच केल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे.
पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तेथे सत्तासूत्रे बदलली आहेत.
भाजप सत्तारुढांविरोधातील जनमताला खूश करण्यासाठी भाकरी फिरवत आहे, असे बोलले जात आहे.
उत्तराखंडमध्ये दोन, कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा आणि त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना भाजपने पायउतार केले आहे.
२०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांना बदलून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे दिली जातील अशी जोरदार चर्चा होती.
नितीन पटेल यांनी आपलीच निवड होणार या शक्यतेने निवासस्थानी पेढे वाटण्यास सुरुवात केली होती,
मात्र पटेल यांच्याऐवजी रुपाणी यांना अमित शहा यांनी पसंती दिली.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा गुजरात दौरा, त्यानंतर आलेली कोरोनाची लाट,
दुसऱ्या लाटेतील आकड्याच्या लपवाछपवीवरून भाजपची डागाळलेली प्रतिमा,
गुजरातमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने सुरू केलेली जोरदार मोहीम हे रुपाणी यांना पायउतार होण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
उत्तराखंडध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या आधी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्रिवेंद्रसिंह रावत यांना राजीनामा द्यावा लागला होता.
कोरोनाची दुसरी लाट आणि कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता येथे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.
रावत यांनी प्रतिकात्मक कुंभमेळा घेण्याची गळ पक्षनेतृत्वाला घातली होती.
मात्र, रावत यांना बाहेरचा रस्ता दाखवत हिंदुत्ववादी ही प्रतिमा गडद करण्यासाठी तीरथसिंह रावत यांना मुख्यमंत्री केले.
त्यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळा घेण्यात आला. त्यानंतर लगचेच त्यांनाही पायउतार करत पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्री केले.
दक्षिणेत भाजपचे कमळ फुलविणारे बी. एस. येडियुरप्पा यांच्यामुळे पक्षाचा दबदबा आहे.
मात्र, ७५ वर्षांवरील नेत्यांना निवृत्ती या नियमानुसार येडियुरप्पा यांना निवृत्ती घेण्यासाठी दबाव आणला.
२०११ मध्ये असाच दबाव आणत त्यांना पायउतार केल्याचा फटका पक्षाला बसला होता.
त्यामुळे यावेळी येडियुरप्पा यांच्या मागण्या मान्य करत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले.
मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात येडियुरप्पा यांच्या मुलाला स्थान नाकारत त्यांना धक्का दिला. मात्र, त्यांचे नीकटवर्तीय बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करून पक्षाने त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा महिन्यात भाजपचे सहा मुख्यमंत्री राजीनामा दिला आहे.
हेही वाचा :