पुणे : ढाेंगी मनोहर भोसले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी | पुढारी

पुणे : ढाेंगी मनोहर भोसले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी

बारामती; पुढारी वृत्तसेवा : संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या गुन्ह्यात अटक केलेल्या मनोहर उर्फ मामा भोसलेला (वय 39, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) बारामती न्यायालयाने पाच दिवस (16 सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (दि. 10) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्म हाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसलेला ताब्यात घेतले होते.

त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आज (शनिवार) सुट्टीच्या न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव

बारामतीतील शशिकांत सुभाष खऱात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामांचा अवतार असल्याचा बनाव केला. फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड कर्करोग बरा करतो असे सांगितले. बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला.

विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत त्‍यांची फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघां विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानूष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

शुक्रवारी अटकेनंतर शनिवारी मनोहर भोसले याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अॅड. किरण सोनवणे यांनी तर भोसलेंकडून अॅड. विजय ठोंबरे यांनी काम पाहिले.

भोसले याच्या अन्य दोन साथीदारांना अद्याप अटक नाही

भोसले याच्या अन्य दोन साथीदारांना अद्याप अटक करायची आहे, गुन्ह्यात घेतलेली रक्कम व वापरलेले वाहन जप्त करायचे आहे.

यासह अन्य बाबींवर तपास करणे बाकी असल्याने पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. तर भोसले यांना अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झालेले नाही.

हे 2018 चे प्रकरण असून पैसे घेतल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. फिर्यादीच्या वडिलांना कर्करोग झाला होता तर तो दवाखान्यात जाण्याएवजी महाराजांकडे का आला?.

तुमचा आसाराम बापू करू अशा धमक्या दिल्या…

भोसले यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेनंतरच काहींनी त्यांना तुमचा आसाराम बापू करू अशा धमक्या दिल्या होत्या. त्यासंबंधी आम्ही पोलिस अधिक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता.

परंतु आमच्या तक्रारीची दखल न घेता बनावट व्यक्ती उभी करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे भोसले यांचे वकिल अॅड. ठोंबरे यांनी सांगितले.

परंतु सरकारी वकिलांच्या युक्तिवादावर न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.

दरम्यान गुरुवारी (दि. 9) मनोहर भोसले विरोधात करमाळ्यात महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.

मनोहर भोसले याच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी नागरिक पुढे येवू लागले आहेत. नागरिकांनी निर्भयपणे पुढे येत तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले आहे.

न्यायालयाबाहेर भक्तांची गर्दी

मनोहर भोसले विरोधात गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. परंतु अद्यापही त्याच्या भक्तांचा गोतावळा कमी झालेला नाही.

मनोहर भोसले याला अटक केल्यानंतर भक्तांनी संताप व्यक्त केला. शनिवारी भोसले याला बारामती न्यायालयात आणण्यात आले.

यावेळी न्यायालयाबाहेर भक्तांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी येथे पुरेसा बंदोबस्त तैनात केला होता. सुट्टी असतानाही न्यायालयाबाहेर गर्दी होती.

Land management : भू व्यवस्थापन करताना खत आणि पाण्याचे नियोजन असे करावे

Back to top button