गडहिंग्लज, पुढारी ऑनलाईन: गडहिंग्लज नगरपरिषदेच्या पू. साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला. तर सानेगुरुजी साहित्य पुरस्कार बालाजी सुतार यांना तर आदर्श शिक्षक पुरस्कार कृष्णा घाटगे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांबाबतची माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी दिली.
२४ डिसेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता लोकशिक्षण व्याख्यानमालेच्या समारोपात पुरस्कार वितरण होईल.
कोरी म्हणाल्या, पू. साने गुरुजी वाचनालायला १४७ वर्षांची परंपरा लाभली आहे. या वाचनालयातर्फे दरवर्षी लोकशिक्षण व्याख्यानमाला चालविली जाते. या व्याख्यानमालेत राज्यस्तरीय साने गुरुजी साहित्य पुरस्कार व डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कारासह आदर्श शिक्षक आणि वाचक पुरस्कार दिले जातात.
याआधी प्रा. विठ्ठल बन्न, मेघा पानसरे, कॉ. संपत देसाई, प्रा. टी. एस. पाटील, बाबासाहेब नदाफ यांना दाभोलकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच राज्यातील नामवंत साहित्यिकांना साहित्य पुरस्काराने गौरविले आहे. यंदा ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. दाभोलकर राज्यस्तरीय पुरस्काराचे २५ हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे स्वरुप आहे. यंदा ज्येष्ठ नेते ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुरस्कार वितरण होणार आहे.
यंदा साहित्य पुरस्कारासाठी कथाकार बालाजी सुतार यांच्या 'दोन दशकांच्या सांध्यावरच्या नोंदी' या कथासंग्रहाची निवड केली आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कृष्णा घाटगे हे दिनकरराव शिंदे मास्तर विद्यालयात कार्यरत आहेत. पाच हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.यावेळी वाचनालय सभापती सुनीता पाटील, नगरसेविका नाज खलिफा, सागर पाटील उपस्थित होते.
हेही वाचा :