District Bank : जिल्हा बँक निवडणुकीत चार संचालकांचे भवितव्य पणाला | पुढारी

District Bank : जिल्हा बँक निवडणुकीत चार संचालकांचे भवितव्य पणाला

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : (District Bank) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (केडीसीसी) संचालकांच्या बहुतांश जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेकांना आपला पत्ता कट होण्याची भीती आहे. तडजोडीच्या राजकारणात अनेक विद्यमान संचालक वर्तुळाबाहेर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संस्था गटावर डोळा ठेवत अनेकांनी उर्वरित 9 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. यातून ओबीसी गटातील एका जागेवर चार संचालकांसह दिग्गजांनी फिल्डिंग लावल्याने येथील उमेदवारी प्रतिष्ठेची बनली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक (District Bank) बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडी असे दोन्ही घटक प्रयत्न करत असल्याने उमेदवारी मिळवणे म्हणजे हमखास संचालकपद पदरात पाडून घेण्यासारखे आहे. यातून जिल्हा बँकेत तब्बल 226 इच्छुक उमेदवार आहेत. कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटातून 16, बँक आणि पतसंस्था गटातून 30, शेती संस्था व व्यक्‍ती सभासद गटातून 29, महिला गटातून 29, अनुसूचित जाती जमाती 19 तसेच इतर मागासवर्गीय गटातून 35 असे एकूण 158 उमेदवार नऊ जागांसाठी इच्छुक आहेत. इतर मागासवर्गीय गटातून (ओबीसी) असिफ फरास, विलास गाताडे, सर्जेराव पाटील व अशोक चराटी हे चार संचालक इच्छुक आहेत. यातील एकालाच संधी मिळणार आहे.

अनेक विद्यमान संचालकांसह दिग्गजांनी संस्था गटातून उमेदवारी मागणी केली असली तरी इतर नऊ जागांतूनही अर्ज दाखल केल्याने उमेदवारीबाबत चुरस वाढली आहे. (District Bank)

जिल्हा बँकेत 21 संचालकांपैकी 12 संचालक तालुक्यातून निवडून येतील. तालुका संस्था गटातून निवडून येणारा संचालक आपल्या संस्थात्मक ताकदीवर विजयी होणार आहे. मागील पाच वर्षांत जाणीवपूर्वक जोडणी घातलेल्या नव्या शिलेदारांचा या गटात निभाव लागणार आहे. येथे उमेदवारी मिळवण्यास अडचण वाटणारे तसेच मॅजिक फिगर गाठण्याची शंका असणार्‍यांनी तडजोड म्हणून इतर गट स्वीकारला आहे. इच्छुकांच्या मांदियाळीतून उमेदवार निवडताना नेत्यांचा मात्र कस लागणार आहे.

Back to top button