धुळे पुढारी वृत्तसेवा : मुलीच्या न्यायहक्कासाठी वृद्ध दाम्पत्याने उपोषणाचा मार्ग अवलंबला मात्र दरम्यान उपोषणाची दखल न घेतल्यामुळे यात आंदोलन करणाऱ्या वृद्ध पित्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
साक्री तालुक्यातील दुसाने येथे राहणारे सुधन्वा भदाने (वय 71 आणि त्यांची पत्नी रंजना भदाणे यांनी 14 मार्च पासून धुळे येथे आमरण उपोषण सुरू केले होते. गेल्या 16 वर्षांपासून त्यांची मुलगी वैशाली हिला तिच्या पतीने माहेरी पोहोचवले होते. या नंतर कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता त्याने दुसरा विवाह केल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. या सोळा वर्षांमध्ये वेळोवेळी प्रशासनाकडे भदाने दाम्पत्याने कारवाईची मागणी करत न्यायाची मागणी केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी 14 मार्च पासून धुळ्यात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाची देखील प्रशासनाने दखल घेतली नाही.
त्यामुळे रविवारी सायंकाळी उशिरा या दांपत्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र यात सुधनवा भदाणे यांचा मृत्यू झाला. तर रंजना भदाणे यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान गेल्या सोळा वर्षापासून मुलीच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी प्रशासनाकडे खेट्या मारून थकल्यानंतर उपोषण करणारे भदाणे परिवाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.