पुणे : पुढारी वृत्तसेवा : उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, तसेच विद्यापीठ, महाविद्यालयांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार देशभरात पाच हजार केंद्रे सुरू करणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या 'विद्यांजली' या उपक्रमांतर्गत ही केंद्रे देशातील पाच हजार विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये सुरू केली जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'विद्यांजली' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत समाजातील उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमासाठी निवृत्त प्राध्यापक, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी, निवृत्त शिक्षकेतर कर्मचारी, वेगवेगळ्या कंपन्यांमधील मोठ्या हुद्द्यांवर असलेले अधिकारी, स्वयंसेवक म्हणून काम पाहणार आहेत. हे स्वयंसेवक कोणताही मोबदला न घेता विद्यांजली केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन आणि मार्गदर्शन करणार आहेत. संबंधित विषयांचे निवृत्त प्राध्यापक या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग घेतील. याशिवाय महाविद्यालयांमध्ये नसलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाविद्यालयांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीही विद्यांजली केंद्र कार्यरत राहणार आहे.
प्रत्येक राज्यात, शहरात आणि ग्रामीण भागातील काही तालुक्यांमध्ये ही केंद्रे उभारणार असल्याचे केंद्रीय शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्या विद्यार्थ्यांसाठी ही केंद्रे वरदान ठरतील, असा विश्वास शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
विद्यांजली उपक्रम सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निवृत्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना आवाहन केले असून, या उपक्रमाशी अधिकाधिक निवृत्त प्राध्यापक जोडले जावेत, असा सरकारचा प्रयत्न आहे.