मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती राज्यात साजरी केली जात आहे. या मुद्यावरून विधानसभेत आज चांगलीच खडाजंगी झाली. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित करत विधानसभेत शिवजयंती साजरी करण्यावरून मुद्दा उपस्थित केला व का साजरी केली जात नसल्याची विचारणा केली. यावरून अजित पवार यांनी विधानसभेच्या प्रांगणात शिवरायांचा भव्य पुतळा असून त्या ठिकाणी ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जाऊन अभिवादन करावे असेहीअजित पवार यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांनी शिवजयंती साजरा करण्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तिथिप्रमाणे शिवजयंती साजरी करावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.
यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मुनगंटीवार यांना वाद न घालण्याची विनंती करत आघाडी सरकारने संशोधनानुसार छत्रपती शिवरायांची जन्म तारीख १९ फेब्रुवारी १६३० निश्चित करण्यात आल्याचे सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर त्या दिवशी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात. आज शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्याचबरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाच्या आमदारांनी अभिवादन केल्याचे ते म्हणाले. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी विधानसभेच्या प्रांगणात जाऊन अभिवादन करावे असेही अजित पवार यांनी सुनावले.
हे ही वाचलं का ?