नितीश राणे : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मैदानात येऊन आमच्याशी मर्दांसारखे लढावे’

नितीश राणे : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मैदानात येऊन आमच्याशी मर्दांसारखे लढावे’

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये दाऊद इब्राहिमचा बिझनेस पार्टनर असलेल्या मंत्री नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही दाऊदची बी टीम आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे आ. नितेश राणे यांनी सोमवारी सोलापुरात केला. याचवेळी त्यांनी 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मैदानात येऊन आमच्याशी मर्दांसारखे लढावे', असेही ललकारले.

खासगी कार्यक्रमासाठी तुळजापूरला जाण्यासाठी नितेश राणे सोमवारी सोलापुरात आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादी हे दाऊदची बी टीम असल्याचा पलटवार केला. दाऊदशी सलगी असणार्‍या मलिकांचा महाविकास सरकार राजीनामा का घेत नाही? असा सवालही त्यांनी केला. भाजप सत्तेसाठी लाचार असल्याच्या आरोपावर भाष्य करताना राणे यांनी 'सत्तेसाठी लाचार असलेल्यांनी शरद पवार व सोनिया गांधी यांच्यासमोर नतमस्तक झाले हे सार्‍या महाराष्ट्राने पाहिले', असा उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता प्रहार केला.

सेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या काय?

शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आरोप करताना राणे म्हटले की, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख शिवसेनेच्या कॅलेंडरमध्ये जनाब म्हणून केला जातो, यावर याची प्रचिती येते. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हिंदूंच्याच सणांवर निर्बंध आणले जात आहेत. अन्य धर्मांबाबत तसे होताना दिसत नाही. मग शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? महाराष्ट्रात हिंदू सध्या असुरक्षित आहेत. रझा अ‍ॅकॅडमीसारख्या संघटनेकडून हिंदूंवर अन्याय-अत्याचार होत आहे, मात्र या संघटनेवर बंदी घालण्याचे धाडस ठाकरे सरकार दाखवित नाही.

दरम्यान राणे यांचे विमानतळावर सकाळी पावणेबारा वाजता आगमन झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, विजयराज डोंगरे, माजी उपमहापौर राजेश काळे, सुनील खटके आदी उपस्थित होते.

राऊत सोलापूरच्या बाजारात विकत मिळतात!

शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगाविताना राणे म्हणाले की, राऊत यांना फारसे महत्व देण्याची गरज नाही. खुद्द शरद पवार राऊतांना महत्व देत नाहीत, केवळ लोणच्यासारखे त्यांचा वापर करतात. असे राऊत सोलापूरच्या बाजारात विकत मिळतात. नोटिसा देण्याचा नामर्दपणा न दाखविता उद्धव ठाकरे यांनी मैदानात येऊन मर्दांसारखे आमच्याशी दोन हात करावे, असे आव्हानही राणे यांनी यावेळी दिले.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news