Latest

नगरमध्ये भाजप-शिंदे-दादा गटाचे सूर जुळेनात!

अमृता चौगुले

नगर : शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडून राज्यात भाजप-शिंदे-अजित पवार हे नवे समीकरण जुळले अन् सत्ता स्थापन झाली. राज्याच्या पातळीवर बड्या नेत्यांचे सूर जुळले. त्यातून जिल्ह्या-जिल्ह्यांत कधीकाळी एकमेकांच्या विरोधात टोकाचा संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांचेही मनोमिलन झाले खरे; पण संघर्षावेळी मनावरील घावाचे वळ अजूनही कायम असल्याने भाजप-शिंदे-दादा गटातील मनभेद मात्र कायम असल्याचे दिसते. नगर जिल्हाही त्याला अपवाद नाही. जिल्ह्यातील मूळ भाजप अजूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायला तयार नाहीत.

संबंधित बातम्या :

नगरच्या जागेबाबत उत्सुकता

नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहे. त्यातील नगर दक्षिणेत भाजपचे सुजय विखे, तर शिर्डीत शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. या दोन्ही जागा राखण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहे; मात्र या जागा मिळविण्यासाठी महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. भाजपचे खासदार विखे-पाटील यांना तोडीस तोड उमेदवार देण्याची रणनीती ठाकरेंनी आखली असून, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे नाव संभाव्य उमेदवारीसाठी अग्रभागी आले आहे. गडाख हे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार असले, तरी ते उद्धव ठाकरे सेनेसोबत आजही कायम आहेत.

विखेंपासून फटकून वागणे परवडणार नाही

शिर्डीची जागा ठाकरेंच्या सेनेकडे आहे. तेथून माजी मंत्री बबनराव घोलप रेसमध्ये असतानाच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हातात शिवबंधन बांधले. वाकचौरे यांच्याकडे ठाकरे सेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात असतानाच घोलपांनी तडकाफडकी ठाकरे शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे शिर्डीच्या दौर्‍यावर येऊन गेल्यानंतरही हा वाद कायम आहे. ठाकरेंनी तिसर्‍यांदा शिर्डी लोकसभा आढावा बैठक बोलावली आहे. एकीकडे महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडे भाजप-शिंदे-अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सूर जुळायला तयार नाही.

जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्तीला त्यामुळेच नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हात घातलेला नाही. मंत्री विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय हे पुन्हा एकदा नगर दक्षिणेत तयारी करत असताना या नियुक्त्या जाहीर करून रोष ओढवून घेण्याची रिस्क घ्यायला ते तयार नाहीत. भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे यांनीही लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. उमेदवार कोण? हा भाजपचा अंतर्गत मामला असला तरी शिंदे-अजित पवार गट विखेंपासून फटकून असणे हे भाजपला परवडणारे नाही.

नगर शहरात खासदार विखेंचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी असलेले गूळपीठ नगर शहरातील भाजपच्या निष्ठावंतांना पचत नाही. त्यामुळेच जगताप-विखे एकत्रित असलेल्या व्यासपीठावर निष्ठावंत दिसत नाहीत. पारनेरमध्येही पवार गटाचे आ. नीलेश लंके यांच्याशी विखेंचे पटत नाही. आ. लंकेंचा नामोल्लेख टाळत खा. विखे कायमच त्यांच्यावर निशाणा साधताना दिसतात.

कर्जत-जामखेडमध्ये दादा-शिंदे गटाचे प्राबल्य नसले तरी तेथील कार्यकर्त्यांसोबत खा. विखेंचे ट्युनिंग जमलेले नाही. पाथर्डी-शेवगावमध्ये भाजपशी दोन हात केलेले शिंदे-दादा गटाचे कार्यकर्ते आजही विखेंपासून दूर आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात तर कोण कोणाकडे हेच अनेकांना उमजत नाही. कधी भाजपच्या तर कधी शरद पवारांच्या आणि कधी बाळासाहेब थोरातांच्या व्यासपीठावर दिसणार्‍या प्रमुख नेत्यांची भूमिका कोणालाच थांगपत्ता लागू देत नाही.

45 प्लससाठी काय?

एकूणच काय तर 45 प्लसचा नारा साकार करायचा असेल, तर भाजप-शिंदे-अजित पवार गटातील सवतासुभा गुंडाळून मनोमिलन होणे गरजेचे आहे. अन्यथा, नगर जिल्ह्यावरील 'मविआ'ची पकड भक्कम होईल, हे सांगणे न लगे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT