Maratha Reservation मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोचवू; आमदार राम शिंदे यांचे आश्वासन | पुढारी

Maratha Reservation मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोचवू; आमदार राम शिंदे यांचे आश्वासन

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : उपोषणाच्या माध्यमांतून मराठा आरक्षणाच्या लढाईला नवा आयाम देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी शहरात महासभा झाली. सभेत मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चातर्फे आमदार प्रा.राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आपल्या भावना व मागणी सरकारपर्यंत पोहोचवू, असे यावेळी आमदार शिंदे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जुन्या तहसील कार्यालयासमोरील मैदानात महासभा झाली.सभेपूर्वी शहरात ठिकठिकाणी त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर बीड कॉर्नर परिसरात क्रेनच्या साह्याने जरांगे पाटील यांना पुष्पहार घालून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

दरम्यान, जरांगे यांचे शहरात आगमन होण्यापूर्वी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र चोंडी येथे भेट दिली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे वंशज आमदार प्रा.राम शिंदे यांनी जरांगे यांचे स्वागत केले. त्यानंतर जरांगे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.

दरम्यान, रात्री साडेआठ वाजता जरांगे यांचे सभास्थानी आगमन झाले. त्यांच्याअगोदर आमदार शिंदे सभास्थानी दाखल झाले होते. आमदार शिंदे सर्वसामान्य श्रोत्यांत जाऊन बसले होते. सभास्थानी आगमन झाल्यानंतर जरांगे यांचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

आमदार शिंदे यांना निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात अण्णासाहेब सावंत, सभापती शरद कार्ले, रवींद्र सुरवसे, पवन राळेभात, राहुल उगले, विजयसिंह गोलेकर, दिगंबर चव्हाण, प्रा सचिन गायवळ, डॉ. भगवान मुरुमकर, सोमनाथ राळेभात, बिभिषण धनवडे, पांडुरंग उबाळे, प्रवीण बोलभट, राम पवार आदींचा सहभाग होता.

हेही वाचा

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे महिला सरपंचाचा राजीनामा

पाथर्डी : हनुमान मंदिराच्या कळसांची चोरी; साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास

Rajgad Bee attack : राजगडावर मधमाश्यांचा हल्ला; पंचवीसहुन अधिक पर्यटक जखमी

Back to top button