Latest

भंडारदरा धरण अखेर ओव्हरफ्लो, धरणातून विसर्ग ७७४४ पर्यंत वाढवला

दीपक दि. भांदिगरे

नगर; पुढारी वृत्तसेवा : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेले भंडारदरा धरण रविवारी (दि.12) ओव्हरफ्लो झाले. दरवर्षीचा ओव्हरफ्लो होण्याचा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकल्यामुळे यंदा धरण भरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होवून पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

सोमवारी पहाटे भंडारदरा धरणातून प्रवरा नदी पात्रात 7744 क्युसेक्स पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला आहे. दरम्यान, निळवंडे धरणात सध्या 86 टक्के साठा असून दोन दिवसांत हेही धरण भरण्याची शक्यता आहे.

भंडारदरा पाणलोटक्षेत्रात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भंडारदरा धरण रविवारी काठोकाठ भरले.
धरणाचा पाणीसाठा 11039 दलघफू (100 टक्के) झाल्याने पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्याद्वारे 2436 क्युसेक्स व विद्युतगृहाद्वारे 820 क्युसेक्स असा एकूण 3256 क्युसेक्स विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आलेला होता.

त्यानंतर पाऊस सुरू असल्याने विसर्ग 4400 क्युसेक्स करण्यात आला. सोमवारी पहाटे विसर्ग 7744 क्युसेक्सपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे रंधा फॉलही रौद्र रूप धारण करू लागला आहे.

दरम्यान, भंडारदरातील ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी निळवंडेत जमा होत आहे. रविवारी सायंकाळी 7130 दलघफू पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर कायम राहिल्यास निळवंडेही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.

नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून 16583 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. भीमा नदीमध्ये दौंड पुलावरून 11,786 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT