ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पठ्ठ्या, असा उपरोधिक उल्लेख करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. पवारांचे अभिनंदन करताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला आहे. अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळाले, तर याचा आनंद असल्याचे सांगत आम्हाला वाईट वाटण्याचे कारणच नाही, वाईट भाजपला वाटले पाहिजे, असा टोला आव्हाड यांनी लगावला. तर ज्यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे, ते अजित पवार आमचेच, अशी सूचक प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली. ते (Jitendra Awhad) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
मागील अनेक दिवसांपासून पालकमंत्रिपदाच्या वाटपाची केवळ चर्चा सुरू होती. सरकारमध्ये अजित पवार गटा सहभागी झाल्यानंतर या पालकमंत्रिपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात संघर्षही सुरू असल्याचं बघायला मिळालं. या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या सुधारित यादीत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद काढून ते अजित पवारांकडे देण्यात आले आहे. चंद्रकांत पाटलांना पुण्याऐवजी सोलापूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपद दिले आहे. (Jitendra Awhad)
अजित पवार राष्ट्रवादीमधून फुटल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा ठाण्याचा पट्ठ्या असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. आव्हाड यांच्यामुळेच पक्षातील अनेक महत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी सोडली असल्याचा आरोपही अजित पवारांनी आव्हाड यांच्यावर केला होता. आता त्याच आव्हाडांनी अजित पवार यांचे अभिनंदन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा