Bhandara-Gondiya News | भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले | पुढारी

Bhandara-Gondiya News | भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले

भंडारा/गोंदिया; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तडकाफडकी राज्यातील ११ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज जाहीर केली. यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या हेवीवेट नेत्यांकडे होते. नव्या यादीनुसार भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद विजयकुमार गावीत यांच्याकडे तर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपद धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. (Bhandara-Gondiya News)

Bhandara-Gondiya News | हे आहेत भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री 

राज्यात पुढच्या वर्षी लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्थानिक नेत्यांना देण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, आधी देवेंद्र फडणवीस आणि आता विजयकुमार गावीत यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने आ. भोंडेकर यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी धर्मरावबाबा आत्राम यांची निवड करुन खा. प्रफुल पटेल यांनी या जिल्ह्यावर आपला दबदबा कायम राखला आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेल्या पालकमंत्र्यांचे फेरबदल महत्वाचे मानले जात आहे.

Maharashtra Guardian ministers |  १२ जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढीलप्रमाणे

 • पुणे – अजित पवार
 • अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
 • सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
 • अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
 • वर्धा – सुधीर मुनगंटीवार
 • भंडारा – विजयकुमार गावित
 • बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
 • कोल्हापूर – हसन मुश्रीफ
 • गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
 • बीड – धनंजय मुंडे
 • परभणी – संजय बनसोडे
 • नंदूरबार – अनिल भा. पाटील

हेही वाचा 

Back to top button