parbhani Guardian Minister : परभणीला पुन्हा बाहेरचेच पालकमंत्री; आता संजय बनसोंडेंवर जबाबदारी | पुढारी

parbhani Guardian Minister : परभणीला पुन्हा बाहेरचेच पालकमंत्री; आता संजय बनसोंडेंवर जबाबदारी

परभणी, पुढारी वृत्तसेवा : राज्यात सत्‍तेत असूनही जिल्हयातील एकाही लोकप्रतिनिधीला गेल्या दहा वर्षात पालकमंत्री पद मिळू शकलेले नाही. तत्पुर्वी देखील अल्पकाळचे एक अपवाद वगळता वर्षानुवर्षे या जिल्हयावर राज्य सरकारने बाहेरचेच पालकमंत्री लादलेले आहेत. परिणामी, स्वत:च्या सोयीनुसार मुंबईत बसून नियोजन समित्यांच्या बैठका घेण्यापासून ते निधीचे वाटप करण्यापर्यंतचे काम या पालकमंत्र्यांनी केले आहे. विशेषत: तानाजी सावंत यांचा गेल्या दीड वर्षातील कारभार असाच उंटावरून शेळया हाकणारा राहिला आहे. आता नव्या पालकमंत्री पदात उदगीरचे संजय बनसोडे यांच्यावर जिल्हयाची धुरा आल्याने त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. (  parbhani Guardian Minister )

संबधित बातम्या 

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जिल्हयाला खा. फौजिया खान यांच्या रूपाने काहीकाळ पालक मंत्रीपद मिळाले होते. मात्र, त्यानंतर २०१४ मध्ये राज्यात आलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांना पालकमंत्रीपद देण्यात आले. शिवसेनेतीलच अंतर्गत धुसपुसीतून रावते यांना बाजुला सारून जळगावचे गुलाबराव पाटील यांच्याकडे जिल्हयाची धुरा देण्यात आली. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्‍तेत आल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांच्यारूपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडे पालकमंत्रीपद गेले. दोन मुंबई व जळगाव अशा अत्यंत दुरच्या मंत्र्यांना दिलेल्या या जबाबदारीने केवळ झेंडावंदन मंत्री व नियोजन समितीच्या बैठका इतकीच जबाबदारी पाहण्यात ही मंडळी मशगुल राहिली. जिल्हयाच्या विकासाकडे आत्मीयतेने या मंत्र्यांनी पालकमंत्री म्हणून पाहिलेच नाही.

त्यातच नवाब मलिक हे इडीच्या चौकशीत अडकल्यानंतर व राज्यातील सत्‍तांतराच्या घडामोडीनंतर या जिल्हयाला डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने शिवसेनेकडे पालक मंत्रीपद गेले. मात्र, त्यांचा जिल्हयाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. झेंडामंत्री म्हणून देखील ते शासकीय ध्वजारोहणांना हजर राहिले नाहीत. दीड वर्षात केवळ दोन दौरे व बैठका इतकाच त्यांचा कार्यक्रम राहिला. मुंबईत बसूनच नियोजन समितीच्या बैठका घेवून निधी वाटपाचे काम शिंदे गटाचे डॉ. तानाजी सावंत यांनी केल्याने जिल्हयाच्या विकासाचे प्रश्‍न कायमच प्रलंबित राहिले. निधीवाटपाचा वाद मंत्रालयापर्यत पोहोचला.

शिंदे गटाचे मंत्री असलेले डॉ. तानाजी सावंत यांच्या पालकमंत्री पदावरून जिल्हयात मोठी नाराजी होती. या पार्श्‍वभुमीवर अलिकडेच सत्‍तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासोबत आलेले उदगीरचे संजय बनसोडे यांना बुधवारी पालक मंत्रीपद जाहीर करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री असलेले बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १९९९ पासून विविध पदांवर कार्यरत आहेत. २०१४ मध्ये उदगीर मतदारसंघातून त्यांचा पराभवही झाला होता. मात्र, २०१९ मध्ये भाजपचे येथील रहिवाशी डॉ. अनिल कांबळे यांचा त्यांनी उदगीरमधून पराभव केला होता. अजित पवारांसोबत सत्‍तेत आल्यानंतर मंत्रीपद भुषवताना परभणी जिल्हयाच्या पालकमंत्र्याची धूरा त्यांच्याकडे आली आहे.

जिल्हयात अजित पवार गटाचे आ. बाबाजानी दुर्राणी, माजी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर व माजी महापौर प्रताप देशमुख ही समर्थक मंडळी असल्याने व राष्ट्रवादीची पकड स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबुत असल्याने नवे पालकमंत्री बनसोडे यांच्याकडून तरी जिल्हयाच्या विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. (  parbhani Guardian Minister )

हेही वाचा : 

Back to top button